

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आळंदी रस्त्यावरील इंदिरानगरजवळील शासकीय जागेत हजारो ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे. राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते शासकीय जागेवर राडारोडा टाकण्यासाठी पैसे घेत आहेत. या राडारोडामुळे परिसरातील झाडे नष्ट होत आहेत. महापालिकेने राडारोडा टाकणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आळंदी रस्ता परिसरात (स. नं. 94) शासकीय मुद्रणालय, मनोरुग्णालय तसेच एका राजकीय व्यक्तींच्या संस्थेची जागा आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. या महापालिकेचे उद्यान, नालाही आहे. शासकीय रिकाम्या जागेचा वापर स्थानिक राजकीय नेत्यांच्या मदतीने त्यांचे कार्यकर्ते राडारोडा टाकण्यासाठी करत असून, त्यासाठी ते पैसे उखळत आहेत.
एक गाडी राडाराडो टाकण्यासाठी ठरावीक पैसे ठरले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शहरातील बांधकामांचा हजारो ट्रक राडारोडा या ठिकाणी आणून टाकला जात आहेत. रस्त्यापासून सुमारे दहा ते पंधरा फूट उंच भर टाकली जात आहे. यामुळे परिसरातील वृक्षसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असून, पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. परिणामी, परिसरातील नैसर्गिक प्रवाहांना अडथळा होऊन हा राडारोडा इंदिरानगरमधील घराच्या परिसरात वाहून येण्याची शक्यता आहे. भाजपचे कार्यकर्ते मंगेश गोळे म्हणाले की, राडारोडा टाकणार्या विरोधात लवकरच महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.
राडारोडा टाकलेला कुणाला दिसू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर गेट तयार केले आहे. त्याला कुलूप लावले आहे. राडारोडा घेऊन गाडी आल्यास गेट उघडले जाते अन् लगेच बंदही केले जाते. रात्रंदिवस हा गैरप्रकार सुरू आहे. शासकीय जागेचा गैरवापर सुरू असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या दोन वर्षांपासून शासकीय जागेत राडारोडा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार केली. मात्र, प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही. कार्यकर्ते पैसे घेऊन या ठिकाणी राडारोडा टाकत असून, प्रशासनाकडून कारवाई केली जाणार नसेल, तर याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली जाईल.
– सुनील गोगले, माजी नगरसेवक
या जागेवर राडारोडा टाकण्यात येत असल्याची तक्रार आल्यानंतर पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. मात्र, त्या ठिकाणी गेटला कुलूप असल्यामुळे आत जाता आले नाही. पोलिस बंदोबस्त घेऊन लवकरच कारवाई केली जाणार आहे.
– विक्रम सरोदे, आरोग्य निरीक्षक, येरवडा क्षेत्रीय कार्यालय
हेही वाचा