

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून अनेक भाविक आळंदीमध्ये दाखल होत आहेत. कार्तिकी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसून येत आहे. आळंदी शहरातील धर्मशाळा, राहुट्यांमधून अभंगाचे सूर निघू लागले असून वातावरण भक्तिमय होऊ लागले आहे.
माउली दर्शनासाठी भाविक दर्शनबारीत दाखल होत असून दर्शनबारी इंद्रायणी नदीपलीकडे गेली आहे. भक्तीसोपान पुलावरील व नदीपलीकडील कमानीमध्ये असलेली दर्शनबारी पूर्णपणे भरलेली दिसून येत आहे. इंद्रायणी नदीपात्रात अनेक भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. शहरात वारकरी भाविकांसाठी विविध साहित्य वस्तू असणार्या दुकानांमध्ये देखील गर्दी होऊ लागली आहे.
कार्तिकीनिमित्त शहरात विविध ठिकाणी वारकरी भाविकांसाठी माउलीभक्त अन्नदान करत असल्याचे चित्र आहे. राज्यभरातून दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या असून शहरात चैतन्य फुलताना दिसून येत आहे. पोलिसांकडून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आल्याने शहरातील रस्ते वाहतूकविरहित दिसून येत असून भाविकांना विनाअडथळा चालता येत असल्याने भाविक समाधान व्यक्त करीत आहेत. पालिकेकडून 10 महत्त्वाचे ठिकाणी टँकरच्या सहायाने पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचाही लाभ भाविकांना होत आहे.