पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दैनिक पुढारी परिवाराचे होत असलेले अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव… जमलेली थोरामोठ्यांची मांदियाळी… गुलाबी थंडीत सुरू असलेले चहापान आणि मस्त रंगलेली गप्पांची मैफल… हास्यविनोद आणि एकमेकांशी सुरू असलेले हितगूज… असा आनंदमेळा दैनिक पुढारीच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 12) पिंपरी-चिंचवडमध्ये जमला होता. मोठ्या दिमाखात आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काळेवाडी-विजयनगर येथील रागा पॅलेसमध्ये दैनिक पुढारी पिंपरी-चिंचवड आवृत्तीच्या वर्धापन दिनाचा हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. सर्वसामान्य वाचकांशी दैनिक पुढारीचे जुळलेले स्नेहबंध यानिमित्ताने अधिक घट्ट झाले.
दैनिक पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त रागा पॅलेसचा परिसर सजला होता. मंजूषा रत्नपारखी आणि प्रणाली रत्नपारखी यांनी काढलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रम स्थळी दै.पुढारी व पुढारी न्यूज यांची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. सायंकाळी 6 ते रात्री 9.30 या वेळेत पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनी अलोट गर्दी करून 'पुढारी'वरील प्रेमाची पोचपावती दिली.
या प्रसंगी 'पुढारी' वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव, संचालक मंदार पाटील, निवासी संपादक सुनील माळी, पिंपरी-चिंचवड आवृत्ती प्रमुख किरण जोशी यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी, पोलिस, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापारी, वकील, बांधकाम व्यावसायिक, सहकार, वाहतूक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण अन् लक्षवेधक
इस्कॉन राधाकुंज विहारी मंदिर (कॅम्प, पुणे) येथील श्रीमद् भागवत कथाकार कृष्ण नामदास महाराज व सहकार्यांनी विठ्ठलभक्ती आणि श्रीकृष्ण भक्तीची गीते सादर केली. प्रसिद्ध चौघडा वादक रमेश पाचंगे, शिवाजीराव थिटे आणि सहकार्यांनी सादर केलेल्या चौघडा, सनई आणि तुतारी वादनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चिंचवडस्टेशन येथील गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, श्रीराम, लक्ष्मण तसेच विविध प्रांतातील वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. चित्रकार गणेश भालेराव यांनी 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे रेखाटलेले चित्र समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. चित्रकार सुधीर बांगर यांनी निसर्गचित्र भेट दिले. फिरोज मुजावर यांनी स्त्री वेशभूषेत आकर्षक लावणीनृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.