पौड: पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती विटंबनाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पौड गावातील युवकांनी भाजयुमोचे मुळशी तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या प्रकाराची माहिती घेत कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
पौड गावातील नागेश्वर मंदिरात 2 मे रोजी मूर्तीच्या विटंबनेची घटना घडली. ही घटना अतिशय निंदाजनक होती. त्यामुळे शनिवारी (दि. 3) गावपातळीवर निषेध मोर्चा काढून बंद पाळण्यात आला.
सोमवारी (दि. 4) मुळशी तालुका बंद ठेवण्यात आला होता. पौड येथे निघालेल्या निषेध मोर्चाला पाच हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. निषेध सभेला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शंकर मांडेकर, संग्रामबापू भंडारे, माजी आमदार संग्राम थोपटे आदींसह मुळशीतील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
या घटनेची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यासाठी पौडमधील केतन मखी, रितेश जाधव, बाळासाहेब पवार, संजय घनवट, योगेश दळवी, ओंकार उबाळे, मंगेश घनवट, तनीश भोकरे हे मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयात गेले होते. या युवकांनी मुख्यमंत्र्यांना घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली.
मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेत आरोपींना कडक शासन करण्याचे तसेच जे काही बेकायदेशीर आहे ते मुळासकट उखडून फेकून देऊ, असे आश्वासन दिले. ही भेट घडवून आणल्याबद्दल भायुमोचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांचे पौड ग्रामस्थांनी आभार मानले. (Latest Pune News)