

प्रसाद जगताप
पुणे : परिवहन विभागाने त्यांच्याकडील सर्व सेवा आता 'फेसलेस' म्हणजेच ऑनलाइन केल्यामुळे नागरिकांना फायदा झाला आहे. पूर्वी आरटीओच्या कामकाजासाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असे. गर्दीमुळे एका कामकाजासाठी नागरिकांना तीन-तीन दिवस वाट पाहावी लागत असे. त्याचाच फायदा घेत राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालय परिसरात एजंटगिरीने धुमाकूळ घातला होता. आता बर्याचशा सेवा 'फेसलेस' झाल्यामुळे एजंटगिरीला आळा बसला असून, नागरिकांचे वारंवार आरटीओ कार्यालयांमध्ये होणारे हेलपाटे कमी झाले आहेत. लायसन्स म्हणजेच वाहन चालविण्याचा परवाना काढणे देखील आता खूप सोपे झाले आहे. त्यासाठीची आवश्यक असलेली चाचणी परीक्षा देखील नागरिकांना घरबसल्या देता येते.
पक्क्या परवान्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा
पक्क्या परवान्यासाठी नागरिकांना संबंधित आरटीओच्या कार्यालयात जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा (वाहन चालवून) द्यावी लागते. पुणे शहरात आळंदी रस्ता येथील आरटीओ कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड येथील आयडीटीआर येथे वाहनचालकांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. कच्चा परवाना मात्र नागरिकांना घरबसल्याच काढता येत आहे.
अशी आहे परवाना काढण्याची प्रक्रिया
www.parivahan.gov.in हे संकेतस्थळ उघडल्यावर त्यामध्ये लायसन्स रिलेटेड सर्व्हिस असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केल्यावर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करावे. त्यानंतर कच्च्या परवान्याबाबत माहिती देणारी साइट ओपन होते. ही साइट ओपन झाल्यावर आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे यांची माहिती भरल्यानंतर वाहनचालकांना कच्च्या परवान्याची चाचणी परीक्षा देता येते. या कच्च्या परवान्याला सहा महिन्यांची अंतिम मुदत असते, त्या मुदतीच्या आत पुन्हा पक्क्या परवान्यासाठी वाहनचालकांना अर्ज करून 6महिन्याच्या आत प्रात्यक्षिक परीक्षा देणे आवश्यक असते. अन्यथा कच्चा परवाना रद्द होतो.
वर्षभरात आरटीओतून मिळालेले परवाने
(एप्रिल ते डिसेंबर 2022)
परवान्यासाठी आलेले अर्ज – 3 लाख 50 हजार 546
मुलाखत घेतलेल्यांची संख्या (अपॉइंटमेंट) -19 हजार 2681
आरटीओला मिळालेला महसूल – 19.71 कोटी
परीक्षा घेतलेल्यांची संख्या – 2 लाख 42 हजार 410
कच्चा परवाना दिलेल्यांची संख्या – 1 लाख 95 हजार 499
नवीन पक्का परवाना दिलेल्यांची संख्या
– 68 हजार 083
डुप्लिकेट पक्का परवाना दिलेल्यांची संख्या- 1 लाख 68 हजार 982
(स्रोत : परिवहन संकेतस्थळ)
परवान्यासाठी शुल्क किती?
कच्चा परवाना
230 रुपये
पक्का परवाना
1200 रुपये