

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसर्या फेरीचे कोटा तसेच कॅपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 6 ते 9 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या भागात दुरुस्ती करण्याबरोबरच पसंतीक्रम भरता येणार आहे. 12 जुलैला प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना 12 ते 14 जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशाठी 324 महाविद्यालयांत 89 हजार 870 कॅपच्या तसेच 24 हजार 480 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 14 हजार 350 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी दुसरी फेरी संपेपर्यंत कोटा आणि कॅप मिळून 37 हजार 851 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी 76 हजार 499 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले आहे.
आता तिसर्या फेरीसाठी 6 ते 9 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येईल. 10 ते 11 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाच्या माहितीवर प्रक्रिया करण्यात येईल आणि 12 जुलैला सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 12 ते 14 जुलैदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहेे.
हेही वाचा