

Pune News: चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची 75 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानिमित्ताने चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे समोर आले आहे.
कुरिअरद्वारे पाठविलेला पदार्थ सापडल्याची बतावणी करून चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका महिलेची तीन लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली.
पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका महिलेची 42 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादर महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी 15 ऑक्टोबर रोजी संदेश पाठविला.
ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी बँक खात्यात पैसे जमा करून घेतले. त्यानंतर महिलेला परतावा दिला नाही. दरम्यान, तिसर्या घटनेत ऑनलाइन टास्कच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एकाची चोरट्यांनी सहा लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.
गुंतवणुकीच्या आमिषाने फसविले
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूड भागातील एका तरुणाची चोरट्यांनी 25 लाख एक हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. फिनवेस्ट कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली.
चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला तरुणाला परताव्यापोटी काही रक्कम दिली. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.