

देवळाली कॅम्प : एकलहरे येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इरिन IRIEEN) या प्रशिक्षण संस्थेत दक्षिण आशियाई देशातील (सार्क) रेल्वे अधिकाऱ्यांनी विकास आणि तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. या 18 अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. (Indian Railways Institute of Electrical Engineering Nashik)
एकलहरे येथे रेल्वेची 'इरिन' ही आधुनिक प्रशिक्षण संस्था आहे. (Indian Railways Institute of Electrical Engineering Nashik - IRIEEN) रविलेश कुमार हे संस्थेचे महासंचालक, तर प्रा. प्रमोद गदरे डीन आहेत. तेथे रेल्वे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. भारतासह बांग्लादेश, भूतान, कंबोडिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम आदी देशांच्या 18 अधिकाऱ्यांनी नुकताच 12 दिवसांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. वरिष्ठ प्राध्यापक जयकुमार कुर्सिजा या अभ्यासक्रमाचे प्रमुख होते. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट ॲन्ड डेव्हलपमेंटच्या बिमस्टेक संस्थेच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण झाले. शाश्वत विकासात रेल्वेची भूमिका ही प्रशिक्षणाची संकल्पना होती. महाराष्ट्रात, विशेषत: नाशिकमध्ये असे प्रशिक्षण प्रथमच झाले. या अगोदर बडोदा येथे असे प्रशिक्षण झाले होते.
नाशिकमध्ये झालेला हा 34 वा प्रशिक्षण अभ्यासक्रम होता. त्यात 'सार्क'मधील रेल्वे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना रेल्वे राष्ट्रविकास आणि वाहतूक यामध्ये काय योगदान देऊ शकते यावर भर देण्यात आला. रेल्वेचे वाहतूक क्षेत्रात भविष्यातील योगदान वाढवून मालवाहतूक वेगवान करून देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास कसा साधता येईल, याची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.
भविष्यात मेट्रो रेल्वे हे वाहतुकीचे मुख्य साधन राहणार आहे. त्याचे ज्ञान देण्यात आले. सार्क देशांमधील रेल्वेचे जाळे व्यापक करून प्रभावी लॉजिस्टिकचे प्रशिक्षण देण्यासाठी 'इरिन'तर्फे विशेष तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रशिक्षणामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गती-शक्ती कार्यक्रमामुळे भारताच्या विकासाने गती पकडली आहे. त्याचे ज्ञान घेऊन आपापल्या देशात विकासाला चालना कशी द्यावी याचे प्रशिक्षण या प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. स्थानिक वाहतूक उद्योग, खासगी कंपन्या, स्थानिक संस्कृती, एतिहासिक वारसास्थळे यांना या प्रशिक्षणार्थींनी भेट दिली.