

रांजणगाव गणपती; पुढारी वृत्तसेवा : सहा घरफोडी व चो-या करणारा अट्टल चोरटा अखेर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. योगेश प्रकाश देवकर असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले मोबाईल व रोख रक्कमही हस्तगत केली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीत देशभरातून कामगारवर्ग नोकरीनिमित्त आलेला आहे. बहुतांश कामगार हे आपल्या खोलीत मोबाईल चार्जिंगला लावून झोपी जातात. त्यांचे एटीएम कार्डही खोलीमध्येच ठेवलेले असते.
याचाच फायदा घेत योगेशने (रा. फलकेमळा, कारेगाव, ता. शिरूर, मूळ रा. ठोबळसांगवी, ता. आष्टी, जि. बीड ) याने चंचेलश मनोरी वुईके याचे एटीएम कार्ड पासवर्डसह चोरून 20,000 रुपयांची, सुमित्रा विश्वजीत पंजा सध्या याचे एटीएम व पासवर्डची चोरी करून 50,000 रुपयांची चोरी केली. तसेच मनुकुमार कुमार याचा एक 10,000 रुपयांचा मोबाईल व मोहनदास वर्मा याचा 10,000 रुपयांचा मोबाईल, रिकेश बोपचे याचा 15,000 रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण 1,05,000/-रुपये किंमतीची रोख रक्कम व मोबाईल चोरी केली.
आरोपीस तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, कॉन्स्टेबल उमेश कुतवळ व विजय शिंदे यांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, त्याने वरील सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिस कोठडीमध्ये त्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने रांजणगाव, कारेगाव परिसरातील आणखी कामगारांच्या खोलीमधूनही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक संजय गायकवाड आदींनी कामगिरी केली.