

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : ऊसतोड सुरू असताना उसाच्या फडात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे कामगारांनी सांगितले. माहिती मिळताच ग्रामस्थ, वन विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू पथक तातडीने त्या शेतात दाखल झाले. परंतु ते बिबट बछडे नसून रानमांजराची पिले असल्याचे निदर्शनास आले. ही घटना पारगाव (ता. आंबेगाव) येथील ढोबळे मळ्यात गुरुवारी (दि. 8) सकाळी 8 वाजता घडली. पारगाव ते काठापूर या रस्त्यावर शेतकरी संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात गेल्या दोन दिवसांपासून ऊसतोडणी सुरू आहे. गुरुवारी (दि. 8) सकाळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार ऊसतोड करत होते. यावेळी त्यांना उसाच्या पाचटाच्या खाली हालचाल दिसली. बिबट्याचे बछडे असावेत, असे समजून कामगारांनी ऊसतोड थांबवून उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांना माहिती दिली. ढोबळे यांनी वनरक्षक साईमाला गित्ते यांना कळवले.
वनरक्षक गित्ते रेस्क्यू पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, रेस्क्यू पथकाचे अशोक जाधव, विवेक चव्हाण, शिवाजी ढोबळे, रंगनाथ चव्हाण आदी शेतकरी देखील जमा झाले. त्यांनी शेतात सावधगिरी बाळगून पाहणी केली असता ती रानमांजराची दोन पिले निघाली. त्यावेळी सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ऊसतोड सुरू करण्याआधी शेतकर्यांनी शेताच्या कडेला फटाके फोडावेत. चाबूक वाजवावेत, मोठ्याने आवाज करावेत. यामुळे बिबटे किंवा अन्य वन्य प्राणी आपली जागा बदलतील. बिबटे किंवा वन्य प्राणी आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा.
साईमाला गित्ते, वनरक्षक.