पिंपरी : सायकल मिळाली आणि आलोकची भावासोबतची पायपीट थांबली !

पिंपरी : सायकल मिळाली आणि आलोकची भावासोबतची पायपीट थांबली !

पिंपरी : किवळेतील मुकाई चौक परिसरात राहणारा, सहावीत शिकणारा आलोक गोडसे या विद्यार्थ्यास लहान भावाच्या आणि स्वत:च्या शिक्षणासाठी दररोज सुमारे 28 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती, याविषयीचे वृत्त दै. 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल सामाजिक संस्था, कार्यकर्ते तसेच पीएमपी प्रशासनाने घेतली आहे. या दोघा भावंडांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल भेट देण्यात आली.

स्मार्ट सिटी असूनही रावेत येथील मुकाई चौकात राहणार्‍या दोघा भावंडांना शाळेच्या वेळेत पीएमपी बससेवा नसल्याने तसेच परिस्थिती बेताची असल्याने शाळेसाठी दररोज सुमारे 28 किलोमीटर पायपीट करावी लागत असे, याविषयी दै.'पुढारी'मध्ये 'शिक्षणाच्या ओढीने तो करतोय 28 किलोमीटरची पायपीट' अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत 'पीएमपी'ने शुक्रवारपासून गहुंजेगाव ते निगडी बस क्र. 303अ/1 मुकाई चौकातून सकाळी सुरू करणार असल्याचे सांगितले. तसेच एका कार्यक्रमात आलोक गोडसेला सायकल भेट देण्यात आली. तर लहान भाऊ अरवला सामाजिक कार्यकर्त्या मंजुश्री राजपूत यांनी सायकल भेट दिली. तसेच आलोकची पुढील शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे भूषण  ओझर्डे यांनी सांगितले.

आमच्या शाळेचे विद्यार्थी अरव व आलोक गोडसे या विद्यार्थ्याची मागील दोन वर्षांची शालेय फी माफ केली आहे. शाळेच्या वेळेत बस सुरू करण्यासाठी तसे पत्र स्वारगेट येथील मॅनेजर व आगारप्रमुखांना दिले आहे.
                                                       -योगिता भेगडे, मुख्याध्यापक

शाळेचे पत्र प्राप्त झाले असून, शुक्रवारपासून शाळेच्या वेळेत बस सुरू करण्यात येणार येईल.
                                         -दत्तात्रय झेंडे,  ट्रान्सपोर्ट मॅनेजर, स्वारगेट, पुणे

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news