

समीर सय्यद :
पुणे : महापालिकेमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश झाल्यास बोर्डाचे सध्या असलेले आठ नगरसेवक जाऊन त्यांच्या जागी महापालिकेमध्ये तीनच नगरसेवकांना जाता येणार आहे. महापालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नगरसेवकांची संख्या
निश्चित होत असल्यामुळे कॅन्टोन्मेंटमध्ये एकच प्रभाग होण्याची शक्यता आहे.
पुणे छावणी परिषद (कॅन्टोन्मेंट बोर्ड) महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या 72 हजार असून, मतदार 45 हजार आहेत. आठ वॉर्डांतून आठ सदस्य निवडून येतात. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे उत्पन्न घटले आहे. कर्मचार्यांच्या वेतनासाठीही निधी नसतो, तर केंद्र शासनाकडून आवश्यक निधी मिळत नाही. कॅन्टोन्मेंट कायद्यात दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जाते.
त्यावर संसदेत कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक ठेवण्यात आले. मात्र, ते अद्याप लोकसभेत सादर झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड हे जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन करण्याची चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात पत्रव्यवहारही झाले.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर होऊनही शेवटच्या टप्प्यात त्या रद्द करण्यात आल्या. त्याचवेळी बोर्डाची महापालिकेत विलीनीकरणाची चर्चाही सुरू झाली. त्यामुळे महापालिकेत गेल्यावर किती जणांना नगरसेवक होता येईल, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुणे महापालिकेत तीन सदस्यांच्या प्रभागात साधारणपणे 2011 मधील 65 हजार लोकसंख्या आहे. त्यानुसार कॅन्टोन्मेंटमध्ये तीन नगरसेवक होण्याची शक्यता आहे.
अधिकार्याचाही दुजोरा…
नगरविकास विभागाने पुणे महापालिकेला पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट समाविष्ट करण्यासंदर्भात स्पष्ट अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यानुसार अहवाल देणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.