पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ड्रीप सिस्टीम बसवून घेऊन झाडांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल, या दृष्टीने विद्युतजोडसह आवश्यक खबरदारी घ्यावी. झाडांची काळजी घ्यावी. मोठे रस्ते, उद्यानामधील कामकाजात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी उद्यान, विद्युत व स्थापत्य विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना दिला आहे.
अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी बुधवारी (दि.20) सकाळी साडेनऊला सांगवी फाटा ते जगताप डेअरी बीआरटीएस रस्त्यामधील उद्यान विभागामार्फत सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी उद्यान, विद्युत, उद्यान व क्रीडा स्थापत्य या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी सांगितले की, शोभिवंत रोपांसह वड, पिंपळाची झाडे लावावी.
रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या रोपांच्या जागेमध्ये पडलेला राडारोडा उचलावा. झाडांची वाढ होईल या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. ड्रीप सिस्टीम बसवून घ्यावी. झाडांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल, या दृष्टीने वीजजोडसह आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच वृक्षारोपण संदर्भातील सर्व उर्वरित कामे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून शनिवार (दि.23) अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
हेही वाचा