दौंड शहरात गर्भवतीच्या मृत्यप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

दौंड शहरात गर्भवतीच्या मृत्यप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  दौंड शहरातील बंगला साईड भागात राहणार्‍या श्वेता रोहित ओहोळ या विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या विवाहितेने बुधवारी (दि.20) रात्री दहाच्या सुमारास आत्महत्या केली होती. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी तातडीने तीन पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी दौंड पोलिसांनी पती रोहित रवींद्र ओहोळ, दीर रोहनआणि रितू, सासू रमा, आतेसासू राणी वसंत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

दरम्यान त्यापूर्वी श्वेता हिच्या सासरच्या लोकांना त्वरित अटक करावी, जोपर्यंत पोलिस त्यांना अटक करत नाहीत तोपर्यंत श्वेता यांचे पार्थिव आम्ही दौंड पोलिस ठाण्यामध्ये ठेवून तेथेच बसून राहू, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी श्वेता यांचे पार्थिव दौंड पोलिस स्थानकात आणून ठेवल्याने काही काळ मोठा गोंधळ झाला होता. जिल्हा पोलिस दलातील अधिकार्‍यांची मुख्यालयात पुणे येथे बैठक असल्याने दौंडचे प्रमुख अधिकारी तिकडे गेल्याने निर्णय घेण्यास उशीर होत होता, अखेर पाटस पोलिस चौकीतून जबाबदार अधिकारी आल्यानंतर तातडीने गुन्हा नोंदविण्यात आला असून अखेर पुण्यातील बैठक संपवून दौंडला आलेले उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या आश्वासनानंतर श्वेता ओहोळ यांचे पार्थिव घेऊन नातेवाईक निघून गेले. एकंदरीतच तीन तास चाललेल्या या गोंधळावर उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी नातेवाईकांना अत्यंत शांतपणे समजून सांगितल्यावर मार्ग निघाला.

श्वेता यांचा पती पुणे पोलिस दलात कर्मचारी आहे. श्वेता ही तीन महिन्यांची गरोदर असून तिच्या पोटात जुळे आहे, असे तिच्या बहिणीने पोलिसांना सांगितले. ही आत्महत्या नसून हत्या आहे. सासरचे लोक श्वेताचा माहेरून पैसे, सोन्याची अंगठी व इतर वस्तू आणण्यासाठी मोठा छळ करत होते, असा आरोपही त्यांच्या बहिणीने केला आहे. तीन वर्षांपूर्वी रोहित रवींद्र ओहोळ याच्याबरोबर श्वेताने प्रेमविवाह केला होता, तिला एक तीन वर्षांचा लहान मुलगा आहे.

हेही वाचा :

Back to top button