

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ज्ञान देणे हे पवित्र काम आहे. हे काम तितक्याच पवित्रतेने केले तर विद्यार्थी चारित्र्य संपन्न होतील. शिक्षण देताना उत्कृष्टतेचा ध्यास ठेवला पाहिजे. नैतिकतेचा कधीच विसर पडता कामा नये आणि बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचे कार्य करावे, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
रावेत येथील जे.एस.पी.एम. संचलित अराईज इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 9) अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवाजीराव पाटील कव्हेकर, चाकूरचे नगराध्यक्ष कपील माकणे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशचे महामंत्री अनुप मोरे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, राजू मिसाळ, जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, संचालिका प्रतिभा पाटील कव्हेकर, अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या कानिका आंनद आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, की शिक्षणामुळेच व्यक्तीला पुरोगामी सत्यशोधक विचार करण्याची सवय लागते. शिक्षणाच्या माध्यमातून आपण सुसंस्कृत समाज घडवू शकतो. शिक्षणाचे महत्व लक्षात घेवून राज्य शासनाने व समाजसुधारकांनी शिक्षण तज्ज्ञांनी शैक्षणिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. आपला देश व समाज सुखी, समृद्ध व सुसंस्कृत घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उत्तम उपाय आहे.
इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढत आहे. त्यामुळे मातृभाषेकडून इंग्रजीकडे विद्यार्थी वळण्याची भीती व्यक्त केली आहे. आपली भाषादेखील टिकली पाहिजे अशासाठी मी आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी बंधनकारक करणार आहे. मराठी भाषा पिढ्यानपिढ्या टिकावी अशा प्रकारचे नियोजन केले आहे, असे उपमुख्यमंत्री
यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, की समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षणाला पर्याय नाही. चांगल्या शाळा, शिक्षक, शिक्षण संस्था, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यातूनच ही शिक्षण चळवळ यशस्वी होते. शिक्षण हे माणसाला विचार करण्याची ताकद देते, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते. गुणवंत, ज्ञानवंत, प्रज्ञावंत यांच्याबरोबर चारित्र्य संपन्न होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे.
हेही वाचा