वायसीएममधील एनआयसीयूची क्षमता वाढवूनही उपचारांसाठी प्रतीक्षाच | पुढारी

वायसीएममधील एनआयसीयूची क्षमता वाढवूनही उपचारांसाठी प्रतीक्षाच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) फुल्ल झाला आहे. त्यामुळे बाळांच्या उपचारासाठी पालकांना एक तर प्रतीक्षा करावी लागत आहे किंवा खासगी रुग्णालय गाठावे लागत आहे. वायसीएम रुग्णालयात सध्या 25 खाटांचे एनआयसीयू उपलब्ध आहे. मात्र, त्यातील 5 खाटा या बालरोग अतिदक्षता विभागासाठी (पीआयसीयू) वापरण्यात येत आहेत. म्हणजे एनआयसीयूसाठी केवळ 20 खाटा वापरात आहेत. वायसीएममध्ये जन्म झालेल्या बाळांसाठी 15 खाटा राखीव ठेवल्या आहेत.

तर, अन्य रुग्णालयांतून वायसीएममध्ये पाठविण्यात येणार्‍या बालकांसाठी 10 खाटांचा वापर होत आहे. एनआयसीयूमध्ये यापूर्वी केवळ 15 खाटांची सोय होती. या खाटांची संख्या वाढविल्यानंतरदेखील एनआयसीयू फुल्ल होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयात महापालिकेच्या अन्य रुग्णालयांतून किंवा खासगी रुग्णालयातून नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात अडचणी येतात. नवजात बालकांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असल्यास अशा परिस्थितीत पालकांसमोर खासगी रुग्णालयाशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

नवजात बालकांना एनआयसीयूची गरज केव्हा लागते?

  • नवजात बालक नाजूक स्थितीत असल्यास
  • बालकाचे वजन प्रमाणापेक्षा कमी असले तर
  • बालकाचा जन्म होताना काही आघात झाला किंवा रक्त जास्त गेले तर त्याला एनआयसीयूमध्ये आईसोबत ठेवतात.
  • नवजात शिशुचा जन्म झाल्यानंतर त्याला लगेच बाहेर न काढता त्याला काही काळ वातावरणासोबत जुळवून घेता यावे, यासाठी एनआयसीयूमध्ये ठेवले जाते. या वेळी उपकरणे लावलेली नसतात. मात्र, काचेच्या आवरणात ठेवले जाते.

वायसीएम रुग्णालयातील एनआयसीयूवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेता येथे आणखी 10 खाटा वाढविण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. परिचारिका आणि वैद्यकीय मदतनीस कर्मचारीदेखील त्यासाठी नियुक्त करावे लागतील.

– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था.

हेही वाचा

Back to top button