पुणे : भाजप-शिवसेना एकत्र येण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. त्याबाबत लहानसा झरोकाही दिसत नसून, चर्चा बंद खोलीत आणि ओपन गार्डनमध्येही होणार नाही. तसेच भविष्यात एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नाही. पण राजकारणात भल्या पहाटे काहीही होऊ शकते, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केले. 'यशदा' येथे रविवारी एका कारसाठी ते आले असता, पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याचे खापर सरकारवर फोडण्याचे कारण नाही. कसबा विधानसभेमध्ये विजय मिळविला की, ईव्हीएम मशीन बरोबर आणि चिंचवडमध्ये अपयश आले की, ईव्हीएम नादुरुस्त असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतो.
मालेगावच्या सभेबाबत छेडले असता ते म्हणाले, खोके, बोके असे बोलून तेच ते मुद्दे काढून लोकांना ते ऐकण्याचा कंटाळा आला आहे. उर्दूमध्ये पोस्टर लावण्याने हिंदुत्व सोडले असे होत नाही. उध्दव ठाकरे यांनी मुस्लिम समाजास काही आश्वस्त केले असेल म्हणून मालेगावमध्ये उर्दूमध्ये बोर्ड लावले गेले असतील.
ईझी मनीची सवय चिंताजनक
शहरातील झाडेतोडीसह जायका, चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना, खराब रस्त्यांसाठी विविध विषयांवर मी सोमवारी सहा बैठका घेतल्या आहेत. शहरातील कोयता गँगकडून होणार्या तोडफोड व विविध घटनांवर पोलिसांनी नियंत्रण आणले आहे. त्यांना मोक्का लावण्यात आलेला असून, सर्वांना घटना होताच अटक करण्यात आलेली आहे. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात ईझी मनीची सवय लागली असून, सहजरीत्या अशा गुन्ह्याकडे ते जात असल्याने सर्वांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.