कारखान्यांतील ऊस वजनकाट्यांची तपासणीच नाही..!

कारखान्यांतील ऊस वजनकाट्यांची तपासणीच नाही..!

[author title="शिवाजी शिंदे" image="http://"][/author]

पुणे : राज्यात असलेल्या साखर कारखान्यांच्या ऊस वजनकाट्यांची गेल्या काही वर्षांपासून तपासणीच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. वास्तविक पाहता ही तपासणी वैधमापनशास्त्र विभागाच्या निरीक्षकांकडून होणे बंधनकारक असते. मात्र, साखर कारखान्याचे अधिकारी आणि निरीक्षक यांच्यात असलेल्या 'आर्थिक' हितसंबंधामुळे केवळ कागदोपत्रीच तपासणी होत असल्याचे उघड वास्तव समोर
आले आहे.

वजनकाट्यांची तपासणी न करता तपासणी झाली असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी कमीत कमी दहा लाखांच्या पुढे रक्कम अदा करावी लागत असल्याची माहितीही पुढे आली आहे. या आर्थिक लागे-बांध्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाचे टनेज कमी होत असून, एका टनामागे किमान 20 ते 50 किलोपर्यंत साखर कारखान्यांकडून 'ऊस वजनकाटा' मारला जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यात सहकारी आणि खासगी असे एकूण 219 साखर कारखाने आहेत. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत साखर कारखानदारी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर स्थिरावलेली आहे. मागील काही वर्षांपासून याच भागात खासगी कारखानेदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहेत.

या सर्व साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांकडून येणार्‍या उसाचे वजन करण्यासाठी कारखान्यांवर ऊस वजनकाटे असतात. एका वेळेस हजारो टन उसाचे वजन या काट्यांवर करण्याची सोय असते. या वजनकाट्यांचे प्रत्येक वर्षी 'वैधमापनशास्त्र' विभागाकडून तपासणी करणे बंधनकारक असते. (कारण या ऊस वजन काट्यांमध्ये कारखान्यांच्या आस्थापनाकडून फेरफार करण्याचे प्रकार घडत असतात. परिणामी शेतकर्‍यांच्या उसाच्या वजनामध्ये घट येते. अर्थात, याबाबत संबंधित शेतकर्‍यांना फारसे काही लक्षातही येत नाही) मात्र, वैधमापनशास्त्र विभागाने तपासणी अधिकारी आणि साखर कारखान्यांचे आस्थापना यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध प्रस्थापित झालेले असतात. त्यामुळे केवळ कागदोपत्री तपासणी झाली असल्याचे दाखवून शेतकर्‍यांची पूर्णपणे फसवणूक केली जात असल्याचे प्रकार मागील काही वर्षांपासून घडत आहेत.

एखाद्या साखर कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची केवळ कागदोपत्री तपासणी करण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागातील तपासणी अधिकारी कमीत कमी 10 लाखांची रक्कम घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकारामुळे साखर कारखान्यांकडून एका टनामागे किमान 20 ते 50 किलोपर्यंत काटा मारतात. त्याचा फायदा साखर कारखानदारांच्या आस्थापनांना होतो. परंतु, शेतकर्‍यांचे यामध्ये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत साखर आयुक्त यांच्याकडून साखर कारखान्यांचे ऊस वजनकाट्यांची तपासणी करावी, असे पत्रक काढण्यात येत असते. मात्र, त्याकडे वैधमापनशास्त्र विभागातील अधिकारी फारसे लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस वजनकाट्यांची तपासणीच झाली नसल्याचे खात्रीलायक दिसून आले आहे.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष

राज्यातील ऊस वजनकाटा कॅलिब्रेशनमध्ये फेरफार करून ऊस वजनात काटमारी केली जाते. याबाबत शेतकरी संघटना, तसेच शेतकरी यांच्याकडून तक्रारी साखर आयुक्त यांच्याकडे होत आहेत. यासाठी वजनकाटा कॅलिब्रेशन करून सील करणे आवश्यक असते. मात्र, आर्थिक लागेबांधेमुळे वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षक यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.

प्रमाणपत्रदेखील बोगस

ऊस वजनकाट्याची तपासणी केल्यानंतर त्याबाबत वैधमानपशास्त्र विभागातील निरीक्षकाने प्रमाणपत्र देणे बंधनकारक असते. तसेच, ते प्रमाणपत्र ऑनलाइनदेखील असणे बंधनकारक आहे. मात्र, कागदोपत्रीच वजनकाट्यांची तपासणी केल्यामुळे ऑनलाइन दाखविण्यात आलेले प्रमाणपत्रदेखील बोगस असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news