पिंपरी : आओ – जाओ घर तुम्हारा ! पालिकेच्या आकुर्डीतील शाळेला नाही सीमाभिंत

शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान
शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान
Published on
Updated on

वर्षा कांबळे : 

पिंपरी : आकुर्डी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एक मराठी व दोन उर्दू माध्यमांच्या अशा तीन शाळा आहेत. शाळांच्या चार इमारती याठिकाणी आहेत; मात्र या शाळेच्या आवारात हुल्लडबाजांचा वावर, मुलींच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था आणि शून्य प्रकल्पामध्ये भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. ही शाळेची इमारतदेखील 35 ते 40 वर्षे जुनी असल्याने शाळा सध्या समस्यांच्या गर्तेत असल्याचे चित्र आहे; मात्र या समस्यांच्या निराकरणाकडे पालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

या ठिकाणी फकीरभाई पानसरे उर्दू सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा, मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय आणि कै. वसंतदादा पाटील विद्यामंदिर ही मराठी शाळा आहे. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा शाळांमध्ये सध्या सर्व मुलांना वर्गात डिजिटल शिक्षण देण्यात येत असले तरी काही शाळांमध्ये भौतिक सुविधांचा भाव आहे. काही शाळांची डागडुजी करण्यात येत असली तरी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शून्य कचरा प्रकल्पात भंगार साहित्य
महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये शून्य कचरा प्रकल्प तयार केला आहे. या शाळांसाठीदेखील एक महिना झाला एक शून्य कचरा प्रकल्प आणि खत प्रकल्प तयार केला आहे. मात्र, त्याचा वापर कसा करायचा याविषयी अजून मार्गदर्शन देण्यात आले नाही. शाळेची डागडुजी सुरू असल्याने सध्या या प्रकल्पात भंगार साहित्य आणून टाकण्यात आले आहे. तसेच खत प्रकल्पातदेखील दारूड्यांनी सोडा व दारूच्या बाटल्या टाकलेल्या आहेत.

मुलींच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था
शाळेच्या माध्यमिक विभागाच्या इमारतीमध्ये जुन्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात लाईट नाही. तसेच फरशा तुटल्या आहेत. छताचा पत्रा तुटला आहे. याठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. याठिकाणी नवीन स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू आहे. जुन्या दोन पैकी एकच स्वच्छतागृह सुरू असल्याने मुलींचा सुटीचा अर्धा वेळ वाया जातो.
आम्ही सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीला व पोलिसांना शाळेच्या सुरक्षेबाबत पत्र देणार आहोत. पोलिसांनी दारूड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करणार आहे. तसेच शाळेच्या सीमाभिंतीचा प्रश्नदेखील यावर्षी सीएसआरच्या माध्यमातून सोडविला जाणार आहे.
-संजय नाईकवडे, प्रशासन अधिकारी, पिं.चिं.मनपा शिक्षण विभाग

शाळेला सीमाभिंत नसल्याने हुल्लडबाजांचा वावर
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळेला कुंपण व सीमाभिंत असणे गरजेचे आहे. मात्र, याठिकाणी काही स्थानिक रहिवासी व मनपा प्रशासन यामध्ये जागेच्या हद्दीवरून वाद असल्याने शाळेस कुंपण किंवा सीमाभिंत बांधण्यास विरोध होत आहे. त्यामुळे याठिकाणी प्रवेशव्दार नसल्याने शाळेच्या आवारात बाहेरील कोणीही व्यक्ती येऊन बसतात. शाळा सुटल्यानंतर याठिकाणी स्थानिक मुले क्रिकेट खेळतात. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा अशी शाळेची अवस्था आहे.

रात्री मद्यपींचा वावर, दारूच्या बाटल्यांचा खच
रात्री याठिकाणी मद्यपी दारू पित बसतात. सुरक्षा रक्षक असला तरी एकटा सुरक्षारक्षक काहीच करू शकत नाही. सीमाभिंत नसल्याने मद्यपींचा फावते. रोज रात्री याठिकाणी मद्यपी दारू पिऊन दारूच्या बाटल्या शाळेत असलेल्या खत निर्मिती प्रकल्पात टाकून देतात. याठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news