खडकी : पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीने संजय गांधी भाजी मंडईत 73 लाख रुपये खर्च करून शेड बांधले आहे. या शेडची उंची मध्यभागी 30 फूट असल्याने उन्हासह पावसाच्या पाण्याचा त्रास भाजी विक्रेत्यांसह नागरिकांना होण्याची शक्यता आहे. यामुळे या शेडीची उंची एवढी का ठेवली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संजय गांधी भाजी मंडईमध्ये बोर्ड प्रशासनाकडून शेड बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे. हे शेड 8 हजार 500 स्क्वेअर चौरस फूटमध्ये उभारण्यात आले असून 18 पिल्लर उभे करण्यात आले आहेत. मात्र, शेड मध्यभागी 30 फूट उंच ठेवून 25 फूट उतरते ठेवण्यात आले आहे. शेडसाठी सुमारे 73 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. शेडची उंची तब्बल 30 फूट ठेवल्याने पावसाचे पाणी, तसेच उन्हाचा फटका भाजीविक्रेत्यांना आणि नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, शेडचे काम पूर्णत्वास येत असून रंगकाम झाल्यावर पुढच्या आठवड्यात हातगाडी व्यावसायिकांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेवर हातगाडी व्यावसायिकांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. दरम्यान, प्रशासनाने 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'साठी योजना तयार केली आहे. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'साठी पन्हाळी लावण्यात येत असून गणपती मंदिराच्या शेजारी असलेल्या बोअरवेलमध्ये हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
संजय गांधी भाजी मंडईच्या शेडची उंची 30 फूट उंच ठेवण्यात आली आहे. हातगाडी व्यावसायिकांच्या मागणीनुसार शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी शेडची उंची वाढविण्यात आली. मात्र, शेडमध्ये पावसाचे पाणी अथवा उन्हाचा फटका बसल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची नाही.
– सुहास संत, प्रभारी अभियंता (कॉन्ट्रॅक्ट), खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड
हेही वाचा