भाजप की राष्ट्रवादी? पुण्यात आघाड्यांमध्ये लढत होण्याची शक्यता

भाजप की राष्ट्रवादी? पुण्यात आघाड्यांमध्ये लढत होण्याची शक्यता
Published on
Updated on

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : महापालिकेत सत्ता कोणाची येणार, भाजपची की राष्ट्रवादी काँग्रेसची यावरच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. निवडणुका कधी होणार याची शाश्वती नसली, तरी त्या केव्हाही जाहीर होऊ शकतील, या भीतीने इच्छुक उमेदवार आपापल्या भागात तयारीत आहेत. त्याचवेळी पुण्यात दोन आघाड्यांत लढत होण्याच्या शक्यतेबाबतही कार्यकत्र्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणुका घेण्याचा आदेश पूर्वी दिला होता. त्यातच राज्यघटनेनुसार प्रशासकाचा कालावधी सहा महिने असतो, ती मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे, निवडणुका तातडीने घेण्याचा निर्णय होईल, अशी शक्यता याचिका करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली.

दुसर्‍या बाजूला, मुंबईतील प्रभागरचनेबाबत उच्च न्यायालयात अर्ज करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळी केली. तसेच, पुण्याच्या बाबत झाल्यास, निवडणुका लांबतील, अशी भूमिका काही जण मांडत आहेत. पुण्यातील प्रभाग तीन की चार नगरसेवकांचा राहील, यावरच उलटसुलट मते मांडण्यात येत आहेत.

निवडणूक आयोगाने तीन सदस्यांच्या प्रभागाची रचना करून आरक्षणेही निश्चित केली आहेत. मात्र, आधीच्या राज्य सरकारने वाढविलेल्या नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा निर्णय नवीन राज्य सरकारने घेतला. त्याचवेळी 2017 प्रमाणे प्रभागरचना असावी, असेही सांगितले. त्यामुळे प्रभागरचना पुन्हा बदलावी लागेल, त्याला काही कालावधी लागणार आहे.

त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडतील. याला सर्वोच्च न्यायालय मान्यता देईल का, याबाबत मतमतांतरे आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि निर्णय यांवरच आता निवडणुका कधी होणार ते ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी तीच भूमिका मध्यंतरी मांडली होती.

भाजप आघाडी करणार का?
भाजपने गेल्या निवडणुकीत पुण्यात एकहाती सत्ता मिळवली. शंभर नगरसेवक असल्याने, तसेच राज्यातील सत्ता पुन्हा हाती आल्याने, भाजप सध्या महापालिकेत सत्ता मिळविण्याच्या तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना, तसेच राज ठाकरे यांची मनसे यांच्यासोबत भाजपची मुंबईमध्ये निवडणूकपूर्व आघाडी होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसे झाल्यास, पुण्यातही काही जागा या पक्षांना सोडाव्या लागतील. विरोधी पक्षांची आघाडी झाल्यास, भाजपलाही अन्य दोन पक्षांसोबत युती करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या काही विद्यमान नगरसेवकांच्या जागा मित्रपक्षाला सोडाव्या लागतील.

महाविकास आघाडी एकत्र लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळविणे अवघड असले, तरी शिवसेनेसोबत त्यांची आघाडी होणार, हे जवळपास ठरल्यात जमा आहे. काँग्रेस सध्या एकला चलो रे ची भूमिका घेत आहे. मात्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात येत आहे. त्याच्या स्वागताला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत.

अंधेरीतील पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीतर्फे तिन्ही पक्ष महापालिका निवडणुकीला एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. तसे झाल्यास, या दोन आघाड्यांमध्ये थेट लढत होईल. आघाड्यांमध्ये लढत झाली, तरी पुण्यात वर्चस्वाची खरी लढत भाजप व राष्ट्रवादी यांच्यातच होणार आहे. त्यामुळे, भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आखणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तयारीला लागले आहेत. या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याचीच उत्सुकता लागलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news