मध्यमवर्गीयांचा शेअरमधील गुंतवणुकीकडे वाढतोय कल

मध्यमवर्गीयांचा शेअरमधील गुंतवणुकीकडे वाढतोय कल
Published on
Updated on

पिंपरी : बँक आणि पोस्ट कार्यालयातील मुदत ठेवीकडे (एफडी) असलेला मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचा कल सध्या शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे सध्या वाढला आहे. शेअर, म्युच्युअल फंड, एसआयपी आदींच्या माध्यमातुन गुंतवणूक करुन अधिक परतावा कसा मिळेल, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. अन्य बचतीच्या पर्यायांच्या तुलनेत शहरामध्ये शेअरमधील गुंतवणूक 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढली असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे.

मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचा सुरुवातीला जास्त कल हा बँक, पोस्ट कार्यालयातील एफडी तसेच आरडी (आवर्त ठेव योजना) आदींकडेच होता. त्याचप्रमाणे, कर बचत करणार्‍या योजनांमध्ये देखील गुंतवणूक केली जात होती. निश्चित परतावा आणि कमी जोखीम यासाठी या गुंतवणुकीकडे लक्ष होते. त्याचप्रमाणे, सोने खरेदीतही गुंतवणूक केली जात आहे. जागांचे आणि फ्लॅटचे वाढलेले दर यामुळे मध्यमवर्गीयांकडून त्यासाठी गुंतवणुकीऐवजी कर्ज घेऊन राहण्यासाठी घर घेण्याचाच प्रमुख दृष्टीकोन असतो.

कोरोनापासून वाढली गुंतवणूक
शेअर बाजारात गुंतवणूक करून तिप्पट-चौपट परतावा मिळाला असे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल किंवा एखाद्या शेअरने केवळ 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 5 पट किंवा 10 पट परतावा दिला आहे असेही ऐकले असेल. याचा अर्थ शेअर बाजारात अनेकदा जास्त परताव्याची चर्चा होते. कोरोनाच्या कालावधीत म्हणजे मार्च 2020 नंतर विविध व्यवहारांवर परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत शेअर मार्केटमधील गुंतवणूकीकडे बर्याच जणांचा ओढा वाढला. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात डी-मॅट अकाऊंट सुरु झाले.

पुरेशी काळजी घ्यावी
अनेकदा भरघोस परतावा मिळवण्याच्या नादात गुंतवणूकदार शेअर बाजारात काहीही विचार न करता गुंतवणूक करतात आणि त्यांचे पैसे बुडतात. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. शेअर मार्केटचा परिपूर्ण अभ्यास करुनच गुंतवूणक करावी. मॅच्युअल फंड, एसआयपी आदी पर्याय देखील गुंतवणूकीसाठी निवडता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

प्राप्तीकराच्या नव्या पद्धतीचाही परिणाम
प्राप्तिकर खात्याकडून गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात लागू केलेल्या प्राप्तिकराच्या नव्या पद्धतीत सार्वजनिक बचतीच्या म्हणजे पीपीएफ, विमा योजना, प्रॉव्हिडंट फंड आदी गुंतवणुकीवर कलम 80 नुसार मिळणारी वजावट रद्द करण्यात आली आहे. जुन्या पद्धतीनुसार कर भरणार्यांना मात्र या सवलतींचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे नव्या पद्धतीने कर भरणार्या नागरिकांचा ओढा आपसुकच शेअर आणि मॅच्युअल फंडाकडे वळला असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.

अर्थसंकल्पातील नवीन तरतुदीनुसार प्राप्तीकराच्या नव्या पद्धतीमध्ये सार्वजनिक बचतीत विमा हप्ता, प्रॉव्हिडंट फंड, मेडीक्लेम आदी गुंतवणुकीवर कलम 80 नुसार मिळणारी वजावट रद्द करण्यात आली आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य उत्पन्न असणार्‍या व्यक्तींचा कल शेअर मार्केट, मॅच्युअल फंडातील गुंतवणूकीकडे वाढला आहे. शहरामध्ये नोकरदार वर्गातील 30 ते 35 टक्के लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडाकडे आकर्षित झाले असावेत, असे वाटते.
– सी.ए. डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष, प्रादेशिक प्रत्यक्ष कर सल्लागार समिती, पुणे विभाग (केंद्रीय वित्त मंत्रालय)

कोरोनाच्या कालावधीत अनेकांनी डी-मॅट खाते सुरु करुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढविली. लोकांना पॅसिव्ह इन्कम हवा आहे. बँकांच्या फिक्स डिपॉझिटचे दर कमी झाले आहेत. प्राप्तीकराच्या नव्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा फायदा नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे शेअर मार्केटकडे वळण्याचा टे्रंड वाढू लागला आहे. शहरामध्ये 25 ते 40 वयोगटातील 35 ते 40 टक्के नोकरदार वर्गाचा कल शेअर मार्केटमधील गुंतवणूकीत आहे.
       – सी.ए. सुहास गार्डी, माजी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सीए शाखा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news