

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे बाजार समिती प्रशासनाने प्रस्तावित अद्ययावत बाजार उभारणीसाठी ठेवलेला सुमारे 70 कोटी रुपयांचा भूखंड विशिष्ट अडत्यांच्या गटाला किरकोळ भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याबाबतची कागदपत्रेही संबंधितांना मिळाली असून, भूखंडासाठी संबंधितांकडून मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा बाजारात आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात काही मोजक्या अडत्यांना डाळिंब विक्रीसाठी शेड दिले आहेत.
काही वर्षांनंतर इतर अडत्यांनीही डाळींब विक्रीला अतिरिक्त जागेची मागणी लावून धरली. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी बाजार समितीने चार नंबर गेटलगत न्यायप्रविष्ट जागेत डाळिंब यार्ड बांधण्याचा घाट घातला होता. मात्र, त्या जागेऐवजी मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली स. नं 559 अ/2 ब/2 1 हेक्टर 34 आर म्हणजे सुमारे तीन ते सव्वातीन एकर पार्किंगची जागा व्यापारासाठी योग्य असल्याचे संबंधित अडत्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
या जागेसंदर्भात यापूर्वी समितीने अडते आणि दि पूना मर्चंट चेंबरच्या पदाधिकारी यांची दोन महिन्यांपूर्वी बैठक घेतली. त्यात या जागेवर अद्ययावत बाजार उभारण्याचे निश्चित झाले. मात्र, अचानक ही जागा डाळिंब यार्डासाठी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, संबंधित प्लॉटवर व्यापार करण्यासाठी पणन विभागाची ले-आऊटला मंजुरी घेण्यात आली नाही. तसेच, तेथे बांधकाम केले जाणार असल्याने महापालिकेची परवानगीदेखील आवश्यक असणार आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.