पिंपरी : स्वच्छतागृहे असून अडचण..! महिलांसाठी स्वच्छतागृहांच्या अपुर्‍या सुविधा

पिंपरी : स्वच्छतागृहे असून अडचण..! महिलांसाठी स्वच्छतागृहांच्या अपुर्‍या सुविधा
Published on
Updated on

वर्षा कांबळे : 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात महिला स्वच्छतागृहाची मागणी शहरात अनेक वर्षांपासून आहे. महापालिकेने शहराच्या काही भागात, बाजारपेठा व इतर वर्दळीच्या ठिकाणी इतरही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून स्वच्छतागृहे बांधण्यात आली; मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे महिलांना तेथे जाणे त्रासाचे ठरत आहे. शहरातील वाकड, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, निगडी येथील एस टी बस थांबे, पीएमपी बस स्टॉप तसेच आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, निगडी इत्त्यादीसह आठही क्षेत्रीय प्रभागमध्ये महिला स्वच्छतागृहांचा अभाव असल्यामुळे कामानिमित्तबाहेर पडणार्‍या महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रसंगी त्यांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे.

चिंचवड, निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, कृष्णानगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर, रूपीनगर, तळवर्डेसह विविध प्रभागांत तहसीलदार, तलाठी, निबंधक, पोस्ट ऑफिस, मनपा दवाखाने, पीएमपीएल बस स्टॉप, बँकासह शासकीय आणि कॉर्पोरेट कार्यालये, शॉपिंग सेंटर आहेत. कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिलांसाठी सदर परिसरात सुरक्षित स्वछतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. विशेषतः निगडी, चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, वाकड येथे एस टी महामंडळाचे प्रवासी थांबे आहेत. याठिकाणी प्राधान्याने महिला स्वछतागृहे असावीत, अशी मागणी खूप वर्षापासून आहे.

शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी महापालिकेने स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध केली तरी येथील नागरिक रस्त्यावरील स्वच्छतागृहाचा वापर करतात. चिंचवड लिंक रोडवरील मैलाशुद्धिकरणाजवळ असलेल्या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे महिलांना याठिकाणी जाणे नकोसे वाटते. तसेच प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि लोकमान्य हॉस्पिटलजवळ असलेले स्वच्छतागृहाजवळ नागरिकांचा वावर असल्याने महिला तेथे जाणे टाळतात.

ई-टॉयलेट काढले

महापालिकेतर्फे 2018 मध्ये निगडीतील मधुकर पवळे चौकातील बसथांब्याजवळ महिलांसाठी सुसज्ज असे ई – टॉयलेट बांधण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव हे ई – टॉयलेट ककाढून टाकण्यात आले.

महामार्गावरील स्वच्छतागृहे कोणी उभारायची?

जे महामार्ग महापालिका हद्दीतून जातात त्याठिकाणी त्या संबंधित महापालिकेने स्वच्छतागृह उपलब्ध करावे असा नियम आहे. मात्र, महामार्गावर स्वच्छतागृहे उभारणे हे रस्ते विकास महामंडळाचे काम आहे असे म्हणून वेळ मारून नेली जात आहे. मग आता महामार्गावर स्वच्छतागृहे कोणी उभारायची असा प्रश्न पडत आहे.

सर्वसामान्य ते कॉर्पोरेट महिलांचीही गैरसोय

स्मार्ट सिटीमध्ये पुरेशी सुसज्ज स्वछतागृहे नसल्यामुळे महिला, मुलींची कुचंबणा होत आहे. त्यामुळे महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सर्वसामान्य महिलांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणार्‍या महिलांनाही या समस्येला सामोरे जावे लागते. तसेच रस्त्यावर ड्युटी करणार्‍या महिला वाहतूक पोलिस, वॉडर्न, भाजी- विक्रेत्या महिला, गवंडीकाम, तसेच इतर किरकोळ विक्रीव्यवसाय करणार्‍या महिलांना तर मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.

आरोग्य विभागाकडून नागरिकांना स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. मात्र, महामार्गावर रस्ते विकास महामंडळाचे काही नियम आहे. रस्त्यावर शौचालये तयार केली तर वाहने थांबून अपघात होण्याची वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने शौचालयाच्या बांधकामाचे जे नियम आहेत ते स्थापत्य विभागच ठरवितो.
                                          -अजय चारठाणकर, आरोग्य प्रमुख, आरोग्य विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news