पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल, तेव्हा राज्यातील महाविकास आघाडी झाडाच्या पत्त्यासारखी उडून जाईल, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.6) पुणे लोकसभा मतदार संघातील सुपर वॉरियर्सची बैठक झाली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या 40 ते 41 जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला होता. याला अनुसरून विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल, तेव्हा राज्यातील महाविकास आघाडी झाडाच्या पत्त्यासारखी उडून जाईल. त्यामुळे 51 टक्के मते घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील. पुणे लोकसभेची जागाही आम्ही मागील वेळीपेक्षा अधिक मते घेऊन जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीचे निमंत्रण आमदार बच्चू कडू यांना न दिल्याने त्यांनी भाजपवर टीका केली. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, बैठकीला जे होते, त्यांच्या मागण्या मला कळाल्या. मात्र, बच्चू कडू बैठकीला नव्हते, त्यामुळे त्यांच्या मागण्या मला कळल्या नाहीत. जागांसंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय मागणी केली असेल तर माहीत नाही. ज्या विषयाची चर्चा बैठकीत झालीच नाही. त्या विषयीची चर्चा सार्वजनिक स्वरूपात करणे योग्य नाही. त्यांनी त्यांची मागणी महायुतीच्या व्यासपीठावर मांडणे गरजेचे आहे. मात्र, ते त्यांच्या स्वभावानुसार अशा पद्धतीने वागत आहेत. कुठलाही उमेदवार ठरवण्याचा अधिकार राज्यपातळीवर नाही. उमेदवार हे केंद्र पातळीवर ठरविण्यात येणार आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा