

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चोरीचा टेम्पो विकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून टेम्पो, रिक्षा व दुचाकी असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इस्माईल शफी सय्यद (वय 44, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. गेल्यावर्षीदेखील त्याने कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पाच वाहने चोरी केल्याचे समोर आले आहे.
चारचाकी टेम्पो चोरी गेल्याप्रकरणी, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
त्या गुन्ह्याचा तपास करत असताना, सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे व त्यांचे सहकारी कर्मचारी सीसीटीव्ही पाहत होते. त्या वेळी एक संशयित आरोपी टेम्पो चोरी करताना दिसून आला. त्याची माहिती घेतली तेव्हा तो इस्माईल शफी असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान, तो टेम्पो विक्रीसाठी ग्राहक शोध असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सुहास मोरे व राहुल थोरात यांना मिळाली. त्यानुसार त्याला पोलिसांनी पकडले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले,संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
आरोपी इस्माईल याला जुगाराचा नाद आहे. त्यातूनच त्याने वाहनचोरी करण्यास सुरुवात केली.चोरी केलेली वाहने तो कमी किंमतीत विक्री करत असे. त्यानंतर त्यातून मिळालेल्या पैशातून तो जुगार खेळत होता. त्याने पोलिसांना पत्ता लागून नये म्हणून काही चोरीची वाहने वेगवेगळ्या ठिकाणी सोडूनदेखील दिली आहेत.