

चाकण : सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 75 हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. ही घटना नाणेकरवाडी येथील वाफगावकर ज्वेलर्स या दुकानात नुकतीच घडली. श्रीरंग संभाजी वाफगावकर (वय 35, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे नाणेकरवाडी येथे वाफगावकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी रविवारी (दि. 21) रात्री आठ वाजता दुकान कुलूप लावून बंद केले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील काचेच्या रॅकवरील 75 हजारांच्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या. सोमवारी (दि. 22) सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाफगावकर यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली