पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर पोलिसांनी वाहनचोरी करणार्या एका चोरास जेरबंद केले असून, वाहनचोरीचे 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. परशुराम शिवाजी मोरे (रा. कोळविरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, मूळगाव कलहिप्परगा, जिल्हा सोलापूर )असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच हडपसर पोलिस ठाण्यातील वाहनचोरीचे सात गुन्हे, भोसरी पोलिस ठाण्याचे दोन गुन्हे, लोणीकंद, विश्रामबाग, बारामती, विजापूर पोलिस स्टेशन, सोलापूर, इंडी- कर्नाटक या ठिकाणचे वाहनचोरीचे प्रत्येकी एक असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.
मोरे हा मोलमजुरीचे काम करतो. त्यास वेगवेगळ्या गाड्यांची आवड असल्याने तो वाहने चोरी करून मूळ गावी घेऊन जात असे. त्यानंतर तो पुन्हा पुण्यात येत असे. तसेच काही वेळेस बारामती, सोलापूर, विजापूर, कर्नाटक या ठिकाणाहून येतानादेखील दुचाकी गाड्या चोरून आणून त्याचा वापर करीत होता, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हडपसर पोलिस वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना, एक व्यक्ती संशयितरीत्या दुचाकीसह पोलिसांना आढळली होती.
त्यामुळे त्या व्यक्तीकडे गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता, त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास पोलिस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, त्याने पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापूर, कर्नाटक या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त हडपसर विभाग बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहीद शेख, अतुल पंदरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.