

सुवर्णा चव्हाण
पुणे: उपनगरांमधील रसिकांची नाटकांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची भूक भागविण्यासाठी उपनगरांमध्येही नाट्यगृहे बांधण्याचा उपक्रम महापालिकेने राबविला खरा; पण या नाट्यगृहांना अद्यापही फारसा प्रतिसाद नसल्याचे नाट्यगृहांच्या उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल 2024 ते मार्च 2025) 14 पैकी 6 नाट्यगृहांचे उत्पन्न खूप कमी आहे. या आर्थिक वर्षात 14 नाट्यगृहांचे एकूण उत्पन्न 3 कोटी 94 लाख 62 हजार 973 रुपयांचे आहे. पण, उत्पन्नापेक्षा महापालिकेकडून नाट्यगृहांच्या देखभाल-दुरुस्तीवर 28 कोटीहून अधिक रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. (Latest Pune News)
त्यामुळे उपनगरांतील नाट्यगृहे महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहेत. कलाकारांची सर्वाधिक पसंती बालगंधर्व रंगमंदिर, श्री गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट), लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह (बिबवेवाडी), यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी (घोले रस्ता) या नाट्यगृहांनाच आहे.
मध्यवर्ती ठिकाण आणि ही नावलौकिक मिळविलेली नाट्यगृहे असल्याने कलाकार आणि संयोजक संस्थांची याला पसंती आहे. पण, उपनगरांत असलेल्या नाट्यगृहांना म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे गेल्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नावरून समोर आले आहे.
नाट्यगृह विभागाकडून नवीन उपाय
उपनगरांतील नाट्यगृहांना प्रतिसाद वाढावा, यासाठी एक उपाय शोधण्यात आला आहे. उपनगरांतील नाट्यगृहांत चार कार्यक्रम करा अन् प्रतिसाद असलेल्या नाट्यगृहात कार्यक्रमासाठी एक तारीख मिळवा, अशी योजनाच येत्या काळात राबविली जाणार आहे.
विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाला प्रतिसाद
हडपसर येथे नव्याने उभारलेल्या विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाला कलाकारांचा आणि कला संस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. येथे नाट्यप्रयोगांसह सांस्कृतिक कार्यक्रम होत असून, गेल्या आर्थिक वर्षात 20 लाख 28 हजार 636 रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे.
या नाट्यगृहांना पुणेकरांची पसंती
बालगंधर्व रंगमंदिर - 87 लाख 12 हजार 566
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) - 77 लाख 83 हजार 656
श्री गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट) - 66 लाख 88 हजार 583
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह (बिबवेवाडी) - 31 लाख 23 हजार 974
पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी (घोले रस्ता) - 20 लाख 25 हजार 937
पंडित भीमसेन जोशी कलामंदिर (औंध) - 28 लाख 47 हजार 567
महात्मा फुले सांस्कृतिक भवन (वानवडी) -27 लाख 77 हजार 336
या नाट्यगृहांकडे आयोजकांची पाठ
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर (येरवडा) - 14 लाख 43 हजार 757
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक) - 3 लाख 37 हजार 781
मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क) - 1 लाख 91 हजार 160
पंडित भीमसेन जोशी कलादालन (सहकारनगर)- 98 हजार 702
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक (गंज पेठ)-7 लाख 22 हजार 958
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंग्यचित्रकार कलादालन (स्वारगेट) - 3 लाख 87 हजार 996
विजय तेंडुलकर नाट्यगृह (सहकारनगर) - 2 लाख 92 हजार 364
उपनगरांतील नाट्यगृहांनाही प्रतिसाद वाढावा, यासाठी आम्ही नेहमीच कला-सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि कलाकारांशी संवाद करतो. काही नाट्यगृहांना प्रतिसाद वाढत आहे. उपनगरांतील नाट्यगृहांमध्ये नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. उपनगरांतील नाट्यगृहांनाही कलाकार आणि संयोजक संस्थांनी प्रतिसाद देत येथे कार्यक्रम करावेत.
- राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, नाट्यगृह विभाग, महापालिका