मावळ्यांच्या मदतीने मिळाले युवकाला जीवदान; राजगडाच्या पाऊलवाटेवर उडी मारताना गंभीर जखमी

मावळ्यांच्या मदतीने मिळाले युवकाला जीवदान; राजगडाच्या पाऊलवाटेवर उडी मारताना गंभीर जखमी
Published on
Updated on

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीवर पायी मार्गाने चालताना एका दगडावरून दुसर्‍या दगडावर उडी मारताना पाय घसरून पडल्याने चैतन्य संतोष किरवे (वय 17, रा. वरवे बुद्रुक, ता. भोर, जि. पुणे) हा युवक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना रविवारी (दि. 22) दुपारी बाराच्या सुमारास घडली. तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने चैतन्यला जीवनदान मिळाले आहे.

चैतन्य किरवे हा इयत्ता अकरावीत शिकत आहे. तो वरवे बुद्रुक येथे मामाकडे राहत आहे. रविवारी सकाळी तो मित्र आदित्य भंडारी, प्रथमेश राऊत व प्रशांत भंडारी यांच्यासोबत राजगडावर फिरण्यासाठी आला होता. बालेकिल्ल्यावरून सुवेळा माचीकडे जाताना चैतन्य हा पाऊलवाटेवर असलेल्या मोठमोठ्या दगडांवर उडी मारत होता. त्या वेळी तो पाय घसरून खाली कोसळला. डोक्याला दगडाचा जबर मार लागून त्याच्या डोक्यातून जोरदार रक्तस्राव सुरू झाला. त्या वेळी त्याचे मित्र घाबरून गेले.

तेथे असलेल्या काही पर्यटकांच्या मदतीने चैतन्यला पद्मावती माचीवरील छत्रपती शिवरायांच्या राजसदरेवर आणले. चैतन्यच्या डोक्यातून पुन्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागल्याचे पाहून पुरातत्व खात्याच्या सुरक्षारक्षकांनी गडावर डागडुजीचे काम करणार्‍या मावळ्यांच्या मदतीने चैतन्यला अतिदुर्गम भागातून जिवाजी पर्वा न करता अवघ्या पंचवीस मिनिटांत स्ट्रेचरवरून सुखरूप पायथ्याला आणले. त्याला तेथे नेईपर्यंत वेल्हे येथील सरकारी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बोरसे व मदतनीस ओंकार देशमाने हे दाखल झाले होते. डॉ. बोरसे यांनी चैतन्यवर प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णवाहिकेतून पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

डॉ. बोरसे म्हणाले की, चैतन्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. मात्र, त्याला तातडीने उपचार मिळाल्याने त्याच्या जिवाचा धोका टळला आहे. कडेकपारीतील अति बिकट पाऊलवाटेने कमी वेळेत खाली आणून वेळेवर उपचार मिळाल्याने चैतन्यला जीवनदान मिळाले आहे. याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार औदुंबर आडवाल म्हणाले की, राजगडावरील दुर्घटनेची माहिती मिळाली आहे. मात्र, याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नाही.

दुपारी बाराच्या सुमारास गडावरील अति दुर्गम सुवेळा माचीवर पर्यटक कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक मावळा जवान संघटनेचे वेल्हे तालुकाध्यक्ष रामभाऊ राजीवडे व रोहित नलावडे यांनी तातडीने गडावरील पुरातत्व खात्याचे सुरक्षारक्षक विशाल पिलावरे यांच्याशी संपर्क साधला.

गडाचे पाहरेकरी बापू साबळे यांनी गंभीर जखमी चैतन्यला गडावरून खाली नेण्यासाठी तातडीने स्ट्रेचर उपलब्ध केले. स्ट्रेचरवर बांधून चैतन्यला घेऊन गडावर डागडुजीचे काम करणारे स्थानिक मावळे अक्षरश: धावत निघाले. राजगडाच्या कडेकपारीतील अति दुर्गम पाऊलवाटेने किरण शिर्के, रवी जाधव, संदीप दरडिगे आदींनी अवघ्या पंचवीस मिनिटांत चैतन्यला गडाच्या पायथ्याला खंडोबामाळावर आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news