

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणातून तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा गुंडांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. विशाल चंद्रकांत अमराळे (वय 35, रा. बिबवेवाडी) आणि लहू जनार्दन माने (वय 40, रा. सुखसागरनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. निखिल ऊर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32, रा. आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पत्नी हर्षदा निखिल अनभुले ( रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फियार्द दिली आहे. ही घटना आंबेगाव ते बिबवेवाडीतील के. के. मार्केटदरम्यान 15 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा ते 16 नोव्हेंबर पहाटे पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान घडली. बेटिंगच्या पैशाचा प्रकार समोर आल्यानंतर पतीला वाचविण्यासाठी हर्षदा यांनी मंगळसूत्र काढून दिले, तरी ही त्याचे प्राण वाचवू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल अमराळे हा क्रिकेट मॅचवर बेटिंग घेतो. त्याच्याशी मृत निखिलची ओळख होती. निखिलने नुकत्याच झालेल्या क्रिकेट मॅचवर विशालकडे बेटिंग लावले होते. यामध्ये तो 28 हजार रुपये हरला होता. ही रक्कम देण्यास निखिल टाळाटाळ करीत होता. यामुळे दोघाही आरोपींनी त्याला अनेकदा धमकावले होते. तरीही निखिल याने पैसे परत केले नव्हते.
त्यामुळे अखेर 15 नोव्हेंबर रोजी आरोपींनी निखिल याला आंबेगाव येथे बोलावून घेतले. तेथून अमराळे व त्याचा साथीदार लहू यांनी त्याचे अपहरण केले. त्याला के. के. मार्केट येथे कोंडून ठेवत मारहाण केली.
याबाबत निखिल याने पत्नीला माहिती दिली होती. पत्नीने मंगळसूत्र घेऊन एका व्यक्तीला पाठवले. मात्र, निखिल याने गुगलपेद्वारे आरोपींना पैसे दिले होते. यानंतर त्याला जखमी अवस्थेत त्याच्या घरी सोडण्यात आले. घरी आल्यावर झोपेत असतानाच निखिलचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनाच्या अहवालात मारहाण झाल्याचे स्पष्ट होताच खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. तपासात निखिलचा मृत्यू विशाल आणि लहू यांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे उघड झाले. दोघांनाही खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट करीत आहेत.