

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'सुमारे 30 ते 35 वर्षांपासून आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या स्मारकाचे रखडलेले काम महाविकास आघाडीचे सरकार असताना करण्याची संधी मिळाली. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या नावाला साजेसे असे स्मारकाचे काम दर्जेदार झाले पाहिजे. बर्याचदा कंत्राटदार चांगले काम करीत नाहीत, कामाचा दर्जा राहत नाही,' अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. त्याच वेळी असे होऊ देऊ नका, अशी सूचनाही त्यांनी केली.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त स्मारक समितीच्या वतीने सोमवारी (दि.14) पुरस्कार वितरण करण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार चेतन तुपे, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, 'स्मारकाचे काम मार्गी लावावे म्हणून मागच्या एप्रिल महिन्यात 87 कोटी 11 लाखांचा धनादेश महापालिकेला दिला होता.
तत्कालीन सरकारमध्ये मी अर्थमंत्री होतो. चांगल्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे स्मारकाच्या जागेचे भूसंपादन करू शकलो. स्मारकाच्या जागेभोवती सुरक्षाभिंतीचे काम सुरू झाले आहे. स्मारकाच्या कामाचा वेग असाच ठेवायचा आहे. स्मारकाचे काम यापूर्वीच करणे गरजेचे होते. मात्र, महापालिकेत आपल्या विचारांची सत्ता नव्हती. त्यामुळे अडचणी आल्या. स्मारकासाठी साडेपाच एकर जागेचे भूसंपादन केले आहे. महापालिकेत सध्या लोकप्रतिनिधी नाहीत.
सध्या सर्व कारभार अधिकार्यांच्या हातामध्ये आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा करून या कामाला गती कशी देता येईल, हे बघावे लागणार आहे.' ते म्हणाले, 'लहुजी वस्ताद यांचे कार्य अनेकांना माहिती नाही, हे दुर्दैव आहे. त्यांचे विचार, त्याग आणि काम नवीन पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे गरजेचे आहे. पुढील पिढीला स्मारकाला भेट दिल्यानंतर इतिहासाचे संपूर्ण चित्र दिसले पाहिजे.'
लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रकार…
काही राजकीय घटना घडत आहेत. हे राजकीय टिप्पणी करण्याचे व्यासपीठ नाही, याची मला जाणीव आहे. संविधानाचा आपण आदर केला पाहिजे. कायदा, घटना याबद्दल कोणी वेगळे करायला लागले, तर त्याकडेही आपले भारतीय म्हणून लक्ष असले पाहिजे. अलीकडच्या काळात काही जण लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार करीत आहेत. लोकशाहीला बाधा येणार नाही, याची जबाबदारी घेतली पाहिजे. बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असे पवार यांनी सांगितले.
जगेल तर सत्तेसाठी…
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारक समितीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. इतिहासात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या सारख्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली. लहुजी वस्ताद यांनी 'जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी,' असे ठरवले होते. आज 'जगेन तर सत्तेसाठी आणि मरेन तर सत्तेसाठी,' या विचाराचे लोक आहेत. लहुजी वस्ताद यांच्या विचारांची आजच्या काळात गरज आहे, तरच आपला समाज खर्या अर्थाने पुढे जाईल, असे अंबादास दानवे म्हणाले.