मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील जलजीवन योजनेच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. सध्या शेलारवाडीकडे जाणार्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या रस्त्यावर 'जलजीवन'च्या जलवाहिनीचा पाइप उभा असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. या योजनेतील सर्व कामे घाईगडबडीत व निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वडगाव रासाई गावात रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे माहीत असूनदेखील संबंधित 'जलजीवन'च्या ठेकेदाराने रस्ता होण्यापूर्वीच जलजीवनचे संपूर्ण पाइप टाकून घेतले. त्यामुळे ठेकेदार पाइपलाइन खोदून नवीन पाइपलाइन टाकून देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवीन पाइपलाइनसाठी चरखोदाई केलेले रस्ते चांगल्या पद्धतीने बुजविलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत. या योजनेतून गावात नळजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परंतु, वरिष्ठ अधिकार्यांचे लक्ष नसल्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल, हे सांगणे अशक्य आहे. गावातील चांगले रस्ते या योजनेच्या कामासाठी खोदून ठेवले आहेत. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
रस्त्याच्या निधीसाठी किती पाठपुरावा लागतो, हे जलजीवनच्या अधिकारी आणि ठेकेदाराला समजणार नाही. काम उरकून योजनेचे पैसे घेऊन ठेकेदार मोकळे होतील. पण, खोदलेल्या रस्त्याचे काय? असा ग्रामस्थांचा सवाल आहे. निकृष्ट कामांमुळे शासनाच्या या नावीन्यपूर्ण योजनेला खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यातच ही योजना सुरू होते की नाही, याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून कामे दर्जेदार करून घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
जलजीवन योजना ही नावापुरती आहे. या योजनेचे काम पूर्ण होणार नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाणार आहेत. जुन्या योजनांच्या माध्यमातून गावपातळीवरील घरोघरी नळ आहेत. त्यामुळे नवीन योजनेच्या नादी न लागता जुन्या योजनेची दुरुस्ती करून गावामध्ये पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे.
– सचिन शेलार, सरपंच, वडगाव रासाई
हेही वाचा