अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवार यांची मागणी
अराजकीय व्यक्तीची नियुक्ती करा
पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय वलय असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करणे चुकीचे आहे. गेल्या काही प्रकरणात आयोगाच्या अध्यक्षांची भुमिका योग्य दिसून आली नाही. पक्षाचा एक विभाग असल्यासारखे आयोगाचे काम कोणी चालवित असेल तर योग्य ठरणार नाही. लोकांच्या आग्रहास्त्व त्यांनी स्वतः हून राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली
महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते. वैष्णवी कस्पटे - हगवणे यांच्या आत्महत्येनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाांबाबत अनेक टिका केल्या गेल्या. त्याबाबत रोहित पवार म्हणाले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तींची नियुक्ती करता कामा नये. या पदावर निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलिस अधिकारीआदी क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती झाली पाहीजे. विधानसभेच्या पुढील अधिवेशनात याबाबत विषय उपस्थित करणार आहोत. महिला आयोगाप्रमाणेच इतर आयोगावर अराजकीय व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
राजकीय व्यक्तीची आयोगावर नियुक्ती झाली तर तेथे राजकारण होणारच असे नमूद करीत आमदार पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षांत या आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करणार्या व्यक्ती या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. यामुळे महिला आयोग हा आपल्या पक्षाचा विस्तारीत विभाग असल्यासारखे कामकाज केले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या नुकसानीसंदर्भात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून केल्या गेलेल्या वक्तव्यांवर आमदार पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, राज्यात 40 हजार हेक्टरहून अधिक जमिनीच्या शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. माणुसकी शुन्य असलेलल्या कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि काय बोलावे याचा क्लास त्यांना लावावा. दररोज नवीन कोट घालायचा एवढेच कोकाटेंना कळते. त्यांना शेतकर्यांचे प्रश्न काय कळणार असा आरोप ही पवार यांनी केला.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरु असताना मी आणि जयंत पाटील यांनी पत्र दिल्याची माहिती खोटी आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याविषयीचा निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे. 5 जून नंतर त्या देशात येणार असून त्यानंतरच याबाबतचा निर्णय ते घेतील, अशी माहिती पवार यांनी दिली.