

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची पाणी समस्या पुढील तीन-चार महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुटेल. पाण्याची चोरी, पाणीगळतीचे प्रमाण 40 टक्के आहे. प्रतिमाणसी किती पाण्याची गरज आहे, याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. सोसायटीधारकांना जाणवणार्या विविध समस्यांबाबत निवडणुका झाल्यानंतर सोसायटी फेडरेशनसमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 21) दिले. सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी आणि सोसायट्यांतील रहिवाशांसमवेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी वाकड येथे बैठक झाली. त्याप्रसंगी त्यांनी हे आश्वासन दिले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार महेश लांडगे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी या प्रसंगी उपस्थित होते.
सोसायटीधारकांसमोर असलेल्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी सचिन लोंढे यांनी केली. सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष व सोसायटीधारकांनी विविध समस्या उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. भामा आसखेड आणि आंद्रा धरणाचे पाणी शहराला मिळायला हवे. कोणतेही राजकारण न करता पाणीप्रश्न सोडविण्यात यावा. पीएमआरडीएच्या मोकळ्या भूखंडांमध्ये झालेले अतिक्रमण हटवावे. सोसायट्यांना उत्पन्नावर आयकर लागू नये, यासाठी राज्य सरकारने लक्ष द्यावे. सोसायट्यांना कन्व्हेअन्स डीड करण्यासाठी येणार्या अडचणी दूर कराव्यात. इंद्रायणी नदीप्रदूषणावर तोडगा काढावा. रस्त्यांवर होणारी अतिक्रमणे हटवावी, अशा विविध सूचना सोसायटीतील रहिवाशांनी केल्या.
फडणवीस म्हणाले की, शहरे मोठी होत असताना त्यांच्यामध्ये बकालपणा वाढला आहे. राज्यातील शहर बदलली पाहिजे. ते लोकांना राहण्यासाठी योग्य व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली अमृत योजना उपयुक्त आहे.