जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे (मल्हार सागर) धरणात गेल्या वर्षी झालेल्या अपुर्या पावसामुळे पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीला धरण कोरडे पडू लागले आहे. पिण्यासाठी नागरिकांसह जनावरांनाही पाणी मिळेनासे झाले आहे, तर दुसरीकडे शेतपिकेही करपून गेली आहेत.
गेल्यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 334 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी (दि. 17) धरणाचा पाणीसाठा हा मृतसाठ्याखाली 59 दशलक्ष घनफूट असून यापैकी 40 दशलक्ष घनफूट गाळ असून उर्वरित 19 दशलक्ष पाणी हे पिण्यास लायक नाही. ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचे संकट समोर उभे राहिले आहे. एकूण 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या नाझरे जलाशयावर जेजुरी शहर, जेजुरी एमआयडीसी, पारगाव माळशिरस योजनेसह नाझरे, पांडेश्वर, मावडी व इतर गावांच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत जवळपास 56 गावांसह वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, तर 3 हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते.
मात्र गेल्यावर्षी झालेल्या अपुर्या पावसामुळे धरण भरू शकले नाही. त्यामुळे पाण्याचे वाटपही काटकसरीने करण्यात आले. सध्याही जेजुरी शहराला 4 दिवसांतून एकदा पाणी दिले जाते. तर मांडकी डोहावरील योजनेतून जेजुरी शहराला पाणी मिळत असल्याने जेजुरीचा पाणी प्रश्न तात्पुरता मिटला आहे. मात्र नाझरे धरणावर अवलंबून असणार्या अनेक गावांसह वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.
हेही वाचा