पुणे : परीक्षा अर्जातच आता मतदार नोंदणीचा रकाना

पुणे : परीक्षा अर्जातच आता मतदार नोंदणीचा रकाना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जातच आता नवीन मतदार नोंदणीसाठी रकाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्षातून चारवेळा मतदार नावनोंदणीसाठी संधी मिळणार आहे. तशा प्रकारची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट निर्देश विद्यार्थी विकास मंडळामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून नागरिकांची निवडणूक मतदार यादीमध्ये नावनोंदणी आणि अद्ययावत करण्याचा कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येत असतो. यामध्ये नवीन व भावी मतदारांच्या नावनोंदणीवर विशेष भर देण्यात येतो.

याआधी येणार्‍या वर्षामधील 1 जानेवारीला 18 वर्षे पूर्ण करणार्‍या नागरिकांनाच मतदार यादीमध्ये नावनोंदणी करता येत होती; परंतु नावनोंदणी प्रक्रियेमध्ये नुकत्याच झालेल्या बदलामुळे आता येणार्‍या वर्षामधील 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या चार दिनांकांपैकी कोणत्याही एका दिनांकास 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना नवीन वा भावी मतदार म्हणून नावनोंदणी करता येणार आहे.तशा प्रकारचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांना मतदार नावनोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी त्याच्या वेबसाईटवर नवीन मतदार नावनोंदणीसाठी 'एक लिंक-एक जनजागृती'च्या स्लोगनसह उपलब्ध करून द्यावी, या लिंकला अर्जदाराला एनव्हीएसपी या पोर्टलवर नवीन मतदार नावनोंदणी फॉर्म 6 येथे निर्देशित करील. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या प्रवेश अर्ज व परीक्षा अर्जामध्ये शेवटी नवीन मतदारासाठी नावनोंदणीकरिता अर्ज अशा टॅगलाईनसह एक रकाना उपलब्ध करून द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news