Pune : मुठा उजवा कालवा बनला धोकादायक

Pune : मुठा उजवा कालवा बनला धोकादायक
Published on
Updated on

कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा : वरवंड ते पाटस (ता. दौंड) हद्दीतून दौंड शहराकडे गेलेल्या नव्या मुठा उजवा कालव्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जागोजागी मोठी भगदाडे पडून कालव्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. दरम्यान कालव्याची दुरुस्ती सुरू केली आहे. मात्र दुरुस्तीसाठी केले जाणारे सिमेंट काँक्रीटीकरणाचे अस्तरीकरण हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकर्‍यांकडून केला जात आहे. मात्र, त्याकडे जलसंपदा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या :

यापूर्वी वरवंड व पाटस हद्दीतून गेलेल्या कालव्याचे सन 1973 मध्ये काम झाले आहे. आतापर्यंत जवळपास 50 वर्षे या कालव्यास पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कालव्याचे अस्तरीकरण हे जीर्ण झाले आहे. काही जागी अस्तरीकरण निखळून कालव्यात दगड, माती साचत आहे, झाडे-झुडपे वाढून काही ठिकाणी मोठमोठे भगदाड पडली आहेत. तर मोठ्या प्रमाणात पाणी गळतीदेखील होत आहे. दरम्यानच्या काळात जलसंपदा विभागाकडून कालव्याची डागडुजी केली गेलेली नाही. सध्या कालव्याचा भराव फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कालव्याची दयनीय अवस्था झाली असून धरणातून सोडलेले पाणी शेवटपर्यंत पोहचण्यास वेळ लागत आहे.

कालव्यात साचलेला राडारोडा, झालेली पडझड व पाणी गळतीमुळे कालवा जागोजागी केव्हाही फुटू शकतो. त्यामध्ये लगतच्या शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. दरम्यान कालव्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली, मात्र दुरुस्तीवेळी होत असलेले सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. केलेल्या काँक्रीटलाच भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कालव्याची चांगली दुरुस्ती करून पाणी गळती थांबवावी, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news