पुणे : पुढारी वृत्तसेवा : सत्ताधार्यांकडून देशातील संविधान, लोकशाही विचार संपवून हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याने आगामी लोकसभा निवडणूक ही देश वाचविण्यासाठीची निवडणूक आहे. त्यामुळे नागरिकांनी देश वाचविण्यासाठी मतदान करावे. देश वाचला तरच विकास होणार आहे. देश आणि संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी शनिवारी (दि.6) व्यक्त केले.
विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने आयोजित विचार वेध संमेलनाला शनिवारी सुरुवात झाली. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात 'लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया' या विषयावर यादव बोलत होते. लेखक तुषार गांधी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, आनंद करंदीकर, सुभाष लोमटे, श्रीरंजन आवटे, मुकुंद किर्दत,
सुनीती सु. र., संदीप बर्वे आदी उपस्थित होते.
यादव म्हणाले, 'जर्मनी आणि युरोपात अपयशी ठरलेले हुकूमशाहीचे मॉडेल भारतावर लादण्याचा प्रयत्न होत आहे. भारतामध्ये पूर्वीपासून संस्कृती, धर्म आणि राष्ट्रवादाचे विचार आहेत. मात्र, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचा राष्ट्रवादाचा विचार हा हुकूमशाही लादणारा असल्याने तो लोकशाहीसाठी घातक आहे. देशातील काही राज्यांमध्ये भाजपची स्थिती मजबूत आहे. परंतु, दक्षिण भारतामध्ये त्यांना यश मिळणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांची परिस्थिती चांगली नाही.
त्यामुळे विरोधकांनी या राज्यांवर लक्ष केंद्रीत केल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे शक्य आहे. लोकशाहीत फक्त संख्या महत्वाची नाही, तर समुदाय महत्वाचा आहे. यंदाच्या निवडणुका हातातून गेल्या तर लोकशाही टिकणार नाही. यावेळचे संकट आणीबाणीपेक्षा गंभीर आहे. संविधानातील मूलभूत विचारांवर सुनियोजित हल्ला होत आहे. सत्तेत बसलेले लोकच प्रजासत्ताक तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.हे संमेलन कोथरूडमधील गांधीभवनमध्ये रविवार (दि.7) पर्यंत सुरू राहणार असून, ' लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा' ही या संमेलनाची संकल्पना आहे.
हेही वाचा