

ओतूर(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : नगर व पुणे जिल्ह्यातील भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या खामुंडी येथील निसर्गरम्य डोंगरावरील धर्मनाथाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला होता. देवदर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथील यात्रेला जुन्नर, खेड, आंबेगाव, पारनेर, अकोले, मुरबाड आदी तालुक्यांतील भाविकभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वर्षानुवर्ष चालत आलेल्या बैलगाडा शर्यतींची परंपरा या वर्षी कायद्याने नियमांचे पालन करून पाळण्यात आली. बैलगाडा शर्यत चालू असल्यामुळे वडापाव, भेळ, आईस्क्रीम, रसवंतीगृह, पाणी व खेळणी विक्रेते या छोट्या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष मारुती बाबूराव शिंगोटे, कार्याध्यक्ष संदीप पांडुरंग गंभीर, सरपंच वनराज शिंगोटे यांनी माहिती दिली की, दर वर्षी माघ महिन्यात येणारी ही धर्मनाथ देवस्थान यात्रा म्हणजे बैलगाडा शर्यत रसिकप्रेक्षकांचे जुन्नर तालुक्यातील एक आगळेवेगळे मुख्य आकर्षण आहे. बैलगाडा शर्यतीसाठी शेकडो गाडामालक या स्थानावर हजेरी लावत असतात. तितक्याच पटीत हजारोंच्या संख्येने भाविकभक्त देखील नतमस्तक होण्यासाठी आपल्या परिवारासमवेत येत असतात. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत प्रेक्षकवर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजेरी लावतात.
परंपरेप्रमाणे रामभाऊ मारुती भोर यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक धर्मनाथाची विधिवत महापूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दिवसभर बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला. भिर्ररच्या दणदणाटाने परिसर दणाणून गेला. सहकुटुंब सहपरिवार बैलगाडीत बसण्याचा आनंद घेत भाविक धर्मनाथ दर्शनासाठी येत होते. कै. संतोष काशिनाथ शिंगोटे यांच्या स्मरणार्थ जनसेवा ग्रुपच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेनिमित्त ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जनार्दन सापटे, होमगार्ड अहिनवे व फलके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.