तरुणाईचा ई – बुक्स वाचनाकडे कल वाढतोय !

तरुणाईचा ई – बुक्स वाचनाकडे कल वाढतोय !

पुढारी वृत्तसेवा : विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वावरणार्‍या तरुणाईचा ई-बुक्सच्या वाचनाकडे कल आहे. संगणक, मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून तरुण-तरुणी विविध विषयांवरील ई-बुक्स वाचताना पाहायला मिळतील. त्यामुळे सध्याच्या घडीला छापील पुस्तकांसह ई-बुक्स प्रकाशित करण्याचेही प्रमाण वाढले आहे. म्हणूनच दिग्गज लेखकांसह नवोदितांच्या ई-बुक्सचाही वाचकवर्ग वाढत आहे. शनिवारी (दि.15) माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जात असून, यानिमित्ताने ई-बुक्सबद्दल घेतलेला हा आढावा.

ई-बुक म्हणजे काय?
ई-बुक म्हणजे इलेक्ट्रॉनिक बुक…एखाद्या छापील पुस्तकाचे डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील रूपांतर. मोबाईल, संगणक आणि लॅपटॉप अशा विविध माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर पुस्तक वाचण्यासाठी ई-बुक ही संकल्पना उद्यास आली आहे. छापील पुस्तकाची आवृत्ती जशीच्या तशी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध करून देण्याला ई-बुक असे म्हणतात. ज्याप्रकारे महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून जतन केली जातात, त्याचप्रकारे छापील पुस्तक हे ई-बुकच्या स्वरूपात जतन केले जात आहे. केव्हाही, कुठेही हे ई-बुक सोशल मीडियाद्वारे वाचता येतात.

असे असते स्वरूप
बहुतांश ई-बुक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. ती मोबाईल अ‍ॅप, संकेतस्थळावरून डाऊनलोड करून वाचता येतात. एकावेळी आपण अनेक लेखकांच्या पुस्तकांचे ई-बुक डाऊनलोड करून वाचू शकतो. अनेक ई-बुक्स मोफत किंवा कमी शुल्कात उपलब्ध आहेत. विविध मोबाईल अ‍ॅप, संकेतस्थळांवर ई-बुक वाचण्याचे किंवा खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. छापील पुस्तकांप्रमाणेच ई-बुकचे स्वरूप असते, पण ती छापील पुस्तकाची ई-आवृत्ती असते. मनोरंजन, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, आरोग्य, मोटिव्हेशल अशा विविध विषयांवरील ई-बुकला प्रतिसाद आहेत.

लेखकांसाठी नवा पर्याय
गेल्या काही वर्षांपासून आपल्या छापील पुस्तकांच्या ई-बुक आवृत्तीकडेही लेखकांचा कल वाढला आहे. दिग्गजांसह नवोदित लेखक ई-बुककडे वळले आहे. जगभरात राहणार्‍या तरुण वाचकांना आपले पुस्तक उपलब्ध व्हावे, यासाठी छापील पुस्तकांसह ई-बुक आवृत्ती करण्यावरही भर दिला जात असून, प्रकाशन संस्थांकडूनही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हल्ली पुस्तक प्रकाशन कार्यक्रमांमध्ये छापील पुस्तकांसह ई-बुक आवृत्तीही प्रकाशित केली जात आहे.

तरुणांचा वाढतोय कल
व्यावसायिक, नोकरदार आणि महाविद्यालयीन तरुणाईला छापील पुस्तकांच्या वाचनासाठी हल्ली वेळ मिळत नाही, त्यामुळेच आता संणक, मोबाईल आणि लॅपटॉपवर ई-बुक डाऊनलोड करून ते कधीही, कुठेही वाचन करतात. त्यामुळे वाचनाशी तरुणाई नक्कीच जोडली गेलेली आहे. रोज किमान दोन ते तीन तास तरुण-तरुणी मिळालेल्या वेळेत ई-बुकचे वाचतात. खासकरून 18 ते 35 वयोगटातील तरुणांचा ई-बुक वाचनाकडे कल आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news