दर्जेदार हापूसची चव आता सर्वांच्या तोंडी; करा वाजवी दरात खरेदी

दर्जेदार हापूसची चव आता सर्वांच्या तोंडी; करा वाजवी दरात खरेदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोकणातील दर्जेदार हापूस आंबा वाजवी दरात खरेदी करण्याची संधी पुणेकर ग्राहकांना उपलब्ध झालेली आहे. शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा थेट शेतकर्‍यांकडून खरेदी करता येणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी महोत्सवास भेट देऊन आंबा खरेदी करण्याचे आवाहन राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले. मार्केट यार्डातील पीएमटी बस डेपोशेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत पणनच्या आंबा महोत्सवाला सोमवारी (दि. 1) सुरुवात झाली. याप्रसंगी कदम यांनी आंबा विक्रीच्या स्टॉलला भेटी देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, देशांतर्गत व्यापार विभागाचे समन्वयक मंगेश कदम, आनंद शुक्ल आणि मॅग्नेट प्रकल्पाचे अधिकारी अमोल यादव उपस्थित होते. शेतकरी ते ग्राहक अशी आंब्यांची थेट विक्री 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरू राहणार आहे. तयार आंब्यांच्या (पिकलेला) खरेदीसाठी ग्राहकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. प्रतिडझनाला रत्नागिरी हापूस 500 ते 1000 रुपये, देवगड 700 ते 1200 रुपये, बिटकी (लहान आंबा) 150 ते 200 रुपये, तर कोकण पायरी आंब्यांची 700 ते 800 रुपये या दराने विक्री झाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news