पुणे : पिकांचे सहजीवन हेच खरे नैसर्गिक शेतीच्या यशाचे गमक!

पुणे : पिकांचे सहजीवन हेच खरे नैसर्गिक शेतीच्या यशाचे गमक!
Published on
Updated on

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : एकत्र कुटुंबव्यवस्था जशी त्या कुटुंबांच्या प्रगतीसाठी, व्यवसायवृध्दीसाठी पोषक असते. तसेच कोणत्याही रासायनिक खतांचा व औषधांचा वापर न करता पिकांची वाढ चांगल्या पध्दतीने होणे व भरघोस पीक मिळण्यासाठी पिकांचे सहजीवन देखील महत्त्वाचे असते. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील शेतकरी दादाभाऊ जाचक याच तंत्राचा वापर करून गेले वीस वर्षे किफायतशीर नैसर्गिक शेती करत आहेत.

चासकमान धरणाच्या कालव्याला लागून असलेल्या वडगाव पाटोळे आणि लगतच्या सर्वच परिसरात प्रचंड रासायनिक शेती केली जाते. आपले कुटुंब व आजूबाजूचे शेतकरी शेतात प्रचंड प्रमाणावर रासायनिक खते-औषधांचा वापर करतात हे चुकीचे असून, हे थांबले पाहिजे, असे दादाभाऊ यांना मनापासून वाटत होते. पण कसे ते मात्र माहीत नव्हते. वीस वर्षांपूर्वी नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष पाळेकर यांचे शिबिर केले आणि त्या दिवसापासून दादाभाऊ जाचक यांनी आपल्या शेतात रासायनिक खते व औषधांचा वापर पूर्णपणे थांबवला.

जाचक यांच्या शेतात सध्या एकाच वेळी एका शेतात टोमॅटो, राजमा, मेथी, कांदा, तर दुस-या शेतात कोंबी, मिरची, वांगी, झेंडू, कलिंगड अशी विविध पिके एकमेकांच्या सहजीवनात मोठ्या जोमाने कोणतीही रासायनिक खते किंवा औषधांशिवाय वाढत आहेत. दादाभाऊ यांच्याकडे तीन-चार देशी गायी असून, त्यांच्या शेण- गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत व शेणखत, कोंबडखत शेतीला दिले जाते. यामुळे रासायनिक खतांचा-औषधांचा खर्च नाही, शेतातील एक पीक गेले तरी अन्य पिके त्याची कसर भरून काढतात, यामुळे कमी खर्चात किफायतशीर शेतीदेखील होते.

शेतात देशी व गावरान वाणांची लागवड
दादाभाऊ जाचक यांच्या शेतात सध्या गावरान भेंडी, मेथी, गवार, पालक, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरच्या, शेवगा, वाटाणा, गाजर, वांगी आदी विविध पिके असून, केळी, पपई, चिकू, पेरू अशी हंगामी फळेदेखील असतात. शेतात पारंपरिक व देशी वाण लावण्यावर त्यांचा कटाक्ष असतो.

असे असते पिकांचे सहजीवन
पिकांच्या सहजीवनाविषयी दादाभाऊ जाचक सांगतात की, शेतात नेहमी एकदल व द्विदल पिके लावली पाहिजेत. तसेच पिकांमध्ये नियमित फेरपालटदेखील केला पाहिजे. यात बाजरीचे एकदल पीक काढले की द्विदल हरभरा पीक घेतले पाहिजे, गहू काढला, की भुईमूग घेतला पाहिजे. जमिनीचा पोत टिकून ठेवण्यासाठी द्विदल पिके पुढच्या पिढीसाठी नत्र ठेवून जातात. यामुळेच नैसर्गिक शेती करताना पिकांचे सहजीवन लक्षात घेऊन शेती केल्यास नक्कीच किफायतशीर शेती होऊ शकते, असे दादाभाऊ जाचक आवर्जून सांगतात.

जमिनीचा एचपी तीन टक्क्यांच्या पुढे
मानवी शरीरात जसे हिमोग्लोबीनचे महत्त्व आहे, तसेच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक कार्बन) असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या रासायनिक खते व औषधांच्या बेसुमार वापरामुळे हे प्रमाण 0.40, 0.60 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. रासायनिक खते व औषधांचा पिकांवर परिणाम होण्यासाठीदेखील सेंद्रिय कर्ब जमिनीत असणे आवश्यक असते; परंतु बहुतेक भागात सध्या जमिनीची मृतावस्थेकडे वाटचाल सुरू आहे. आमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 3 टक्क्यांच्या पुढे आहे. आमच्या जमिनी सुदृढ असल्याचे हे लक्षण आहे, असेही दादाभाऊ जाचक यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news