

पुणे : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याच्या सणामुळे श्रीखंड, आम्रखंड, खवा आणि बासुंदीच्या मागणीत तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी या पदार्थांच्या विक्रीदरात वाढ झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीतून घरोघरी पाडव्याचा गोडवा वाढणार आहे. कोरोना काळानंतरच्या दोन वर्षांत प्रथमच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांकडून उत्पादक कंपन्यांकडे आगाऊ मागणी नोंदविण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांची विक्री निश्चित वाढेल, अशी माहिती राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व कल्याणकारी संघाचे मानद सचिव आणि कुतवळ फुड्सचे चेअरमन प्रकाश कुतवळ यांनी दिली. ते म्हणाले, 'बाजारपेठेत प्रतिकिलोस श्रीखंड 260 रुपये, आम्रखंड 260 रुपये, खवा 330 ते 350 रुपये आणि बासुंदीचा दर प्रतिलिटर 350 ते 380 असून, मागणी वाढली तरी दर स्थिरच आहेत.'
अलिकडील तीन-चार महिन्यांत दूध खरेदीदरात सुमारे वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना स्थितीच्या दोन वर्षांनंतरचा हा गुढीपाडवा असल्यामुळे श्रीखंड, आम्रखंड आणि बासुंदीला दहा टक्क्यांपेक्षा अधिक मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. तर, पाडव्याच्या सणानंतर भविष्यात दुग्धजन्य पदार्थांचे दर कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे वाढविण्याशिवाय पर्याय नाही.
श्रीपाद चितळे, संचालक, चितळे दूध