मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील शेवाळवाडी-मणिपूर येथे महावितरण कंपनीच्या वीजवाहक तारा तुटल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन सहा एकर ऊस जळाल्याची घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी दोन वाजता घडली. वीजपुरवठा खंडित झाल्याने मंचर शहराचा वीजपुरवठा पाच तास बंद राहिला. जळालेल्या उसाचा महसूल खात्याने सात लाख रुपयांचा पंचनामा केला आहे.
शेवाळवाडी ग्रामपंचायतअंतर्गत मणिपूर येथे महावितरण कंपनीचे उपकेंद्र आहे.
तेथून बाहेर पडणार्या वीजवाहक तारा शेतकरी सदानंद भोर आणि दीपक थोरात यांच्या उसाच्या पिकावरून गेलेल्या आहेत. शुक्रवारी दुपारी वीजवाहक तारा तुटल्याने त्या तारांखाली असलेला सहा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ऊसपिकाचे नुकसान झाल्याने संतप्त शेतकर्यांनी महावितरण कंपनीच्या वायरमन यांना वीजवाहक तारा जोडण्याअगोदर शेतात उभे असलेले खांब आणि तारांची पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच वीजवाहक तारा जोडून देण्याची भूमिका घेतली.
त्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यासाठी अडचण झाली. मंचर शहराचा वीजपुरवठा सुमारे पाच तास बंद होता. महावितरणच्या अधिकार्यांनी तपनेश्वर आणि मोरडेवाडी येथून पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून मंचर शहराचा वीजपुरवठा सायंकाळी सात वाजता पूर्ववत केला आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकार्यांनी दिली.