Purandar Airport land aquisition
पुणे : पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणार्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी राज्य सरकारने हालचाली गतीने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात शेतकर्यांना कोणत्या स्वरूपाचा मोबदला देता येईल, यावर शासन पातळीवर सध्या सखोल चर्चा सुरू आहे. लवकरच पॅकेज जाहीर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रस्तावित विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे 2 हजार 673 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या निर्णयाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध झाला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी या गावांतील सर्व्हेक्षणही थांबवले होते.
या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन करणार्या शेतकर्यांची भेट घेतली होती. या वेळी त्यांनी शेतकर्यांना मोबदल्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सात दिवसांची मुदत दिली होती. अन्यथा शासन स्वतःच कायदेशीर पॅकेज जाहीर करेल, असा इशारा त्यांनी दिला होता.सध्या शासन स्तरावर विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.
विमानतळासाठी सुमारे 6 हजार 500 एकर जमीन आवश्यक आहे. सध्या 4 हजार 500 शेतकर्यांच्या सातबार्यावर या प्रकल्पाची नोंद करण्यात आली आहे. या भूसंपादनामुळे 3 हजारपेक्षा अधिक शेतकरी पूर्णतः भूमिहीन होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारकडून जाहीर होणार्या पॅकेजची माहिती आणि शेतकर्यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
भूसंपादन प्रक्रियेबाबत शेतकर्यांना 29 मेपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. आतापर्यंत 794 शेतकर्यांनी हरकती सादर केल्या आहेत. या हरकतींवर लवकरच सुनावण्या घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे वनपुरी येथील शेतकर्यांनी हरकती नोंदवण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.