सोसाट्याचे वारे अन् नुसताच धुरळा..! पावसाने ओढ दिल्याने पिके लागली जळू

सोसाट्याचे वारे अन् नुसताच धुरळा..! पावसाने ओढ दिल्याने पिके लागली जळू

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेली उभी पिके पाण्याअभावी जळून चालली असून, शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. सध्या फक्त सोसायट्याचा वारा आणि धुरळ्याचा त्रास, अशी स्थिती आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, शिरसटवाडी, अंथुर्णे, भरणेवाडी, वालचंदनगर,कळंब, रणगाव आदी भागांतील शेतकर्‍यांवर एकामागे एक नवीन संकट येत असून, शेतकरी पुरता खचून चालला आहे. यावर्षी उन्हाळ्यात निरा डावा कालवा फुटल्याने तब्बल एक महिना उशिराने कालव्याचे आवर्तन मिळाले.

त्या वेळी पिकांना पाण्याचा आचका बसला होता. त्यातून पुन्हा कालव्याचे पाणी मिळाले तर आता पावसाने ओढ दिली आहे. वास्तविक, या भागात किमान एक-दोनवेळा तरी मान्सून पूर्व पाऊस पडत असतो. मात्र, यावर्षी एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. परिणामी, कशीबशी जगवलेली पिके पुन्हा जळून जाण्याच्या मार्गावर आली आहेत.
या भागात शेकडो हेक्टर क्षेत्रावर उसाची पिके आहेत. उसाच्या पिकाला पाण्याची मोठी गरज असते.अशातच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कधी दुष्काळ,कधी ओला दुष्काळ तर कधी पाटबंधारे विभागाचा नियोजनशून्य कारभार या व आदी कारणांने परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत चालला असताना निसर्गाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

पाऊस लांबणार
या परिसरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून दिवसभर सोसाट्याचे वारे वाहत आहे. त्यासोबत जमिनीवरील धुरळा हवेत उडत आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करणारे शेतकरी, वाहनचालक धुरळा डोळ्यांत जाऊन त्रस्त झाले आहेत, तर मोकळ्या वार्‍याने पाऊस लांबण्याची शक्यता असल्याचे शेतकर्‍यांमध्ये बोलले जात आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news