

राजेंद्र गलांडे
Baramati News: बारामती विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा विजय मिळविला. इतरांवर विसंबून न राहता त्यांनी जातीने प्रचारात लक्ष घातल्याने हे शक्य झाले. त्यांचा आता राज्य मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असून, त्यानंतर येथील विकासाची गती अधिक वाढावी, अशी अपेक्षा बारामतीकरांना आहे.
अर्थात, पवार यांनी विजयानंतर लागलीच ‘मी कोणावर टीकाटिप्पणी करत बसण्यापेक्षा कामाला प्राधान्य देईन,’ असे सांगितल्याने आगामी काळात बारामतीच्या विकासाचा वेग आणखी वाढेल, हे निश्चित. बारामती मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी असे मूलभूत प्रश्न यापूर्वी चर्चिले जात होते. रस्त्यांचा प्रश्न आता जवळपास सुटल्यात जमा झाला आहे.
अगदी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर चांगल्या दर्जाचे रस्ते, चांगल्या शासकीय इमारती झाल्या आहेत. वाडी-वस्तीवर वीज पोहचली आहे. पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने जिरायती भागाला भेडसावतो आहे. त्यासाठी जनाई-शिरसाई, पुरंदर उपसा सिंचन योजनेची रखडलेली कामे यापूर्वीच हाती घेण्यात आली आहेत. या योजना सौरऊर्जेवर नेण्यात येत आहेत. या योजनांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या अन्य गावांसाठी एक हजार कोटी रुपयांचा निरा-कर्हा जोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा, अशी जिरायती भागातील जनतेची आता अपेक्षा आहे.
निरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न होणे गरजेचे आहे. निरेच्या प्रदूषित पाण्यामुळे तालुक्यातील जमिनी मोठ्या प्रमाणावर नापीक होत चालल्या आहेत. वेळीच काळाची पावले ओळखत प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बारामती तालुक्यात पाच पोलिस ठाणी आहेत. परंतु, येथील गुन्ह्यांची संख्या लक्षात घेत कायदा व सुव्यवस्थेकडे पवार यांना अधिकचे लक्ष द्यावे लागणार आहे. शिक्षणानिमित्त राज्यभरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी बारामतीत येतात. त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासकामांच्या जोरावरच जनतेने त्यांना आठव्यांदा संधी दिली आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा हेही त्यांच्या विजयाचे कारण आहे. लाडकी बहीण योजना, शेती पंपाचे वीजबिल माफ, याचाही मोठा हातभार त्यांच्या विजयात लागला. विशेष म्हणजे, शहरासह तालुक्यातील जिरायती व बागायती या दोन्ही भागांनी अजित पवार यांना भरभरून मतदान केले. कोणत्याच भागाने, कोणत्याही जाती-धर्माने ती उणीव ठेवली नाही.
त्यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार युगेंद्र पवार हे नवखे होते. तरीही अजित पवार यांच्याविरोधात त्यांनी चांगली मते मिळवली. युगेंद्र यांच्यामागे खा. शरद पवार यांची ताकद होती. परंतु, जनतेने भावनिकतेपेक्षा यंदा विकासाला प्राधान्य दिले. नवख्या युगेंद्र यांच्या प्रचारातही सुसूत्रता नव्हती. खा. पवार, खा. सुप्रिया सुळे हे राज्यात प्रचाराला असल्याने त्यांना बारामतीत अपेक्षित वेळ देता आला नाही. त्याचाही परिणाम दिसून आला.
शरद पवार गटाला मेहनत घ्यावी लागणार
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, अशी निवड बारामतीकरांनी केली आहे. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका आता आगामी काळात होतील. त्यासाठी शरद पवार गटाला मोठी मेहनत घ्यावी लागेल. सहकारी साखर कारखाने, सहकारातील अन्य संस्थांमध्ये शिरकाव करायचा असेल, तर पराभव विसरून लागलीच कामाला सुरुवात करावी लागेल.
एमआयडीसीत मोठ्या उद्योगांची गरज
बारामती आणि पणदरे या दोन्ही ठिकाणच्या एमआयडीसीमध्ये मोठ्या उद्योगांची गरज आता निर्माण झाली आहे. बारामतीत येऊ घातलेल्या भारत फोर्जचा 2 हजार कोटींचा प्रकल्प आमच्यामुळेच येत असल्याचा दावा प्रचारकाळात दोन्ही गटांनी केला. हा प्रकल्प कोणाच्याही प्रयत्नातून येईना; पण तो बारामतीत झाला तर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. पणदरे एमआयडीसीत मोठी जागा, रस्ते, पाणी अशा सोयीसुविधा आहेत. तेथे मोठा प्रकल्प आला, तर रोजगाराच्या आणखी संधी निर्माण होतील.
पाणी प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची गरज
जिरायती भागातील पिण्याच्या पाण्याची अडचण सोडविण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या योजनांची कामे सुरू आहेत. हे प्रकल्पही लवकर पूर्ण झाले, तर जिरायती भागाचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.