

Pune News: पावसाळ्यात आलेल्या पुराने ताडीवाला रोड येथील गोदामात ठेवलेल्या मालाचे (डुकराचे मटण) 10 लाखांचे नुकसान झाल्यानंतर मालाचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे तगादा लावणार्याने मुलांना उचलून नेण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासामुळे एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजा परदेशी (वय 44) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. 23) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी त्यांची पत्नी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी लक्कडसिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा परदेशी यांचा मटणाचा व्यावसाय आहे. ताडीवाला रोड येथे त्यांचे मित्राचे गोदाम होते. लक्कडसिंग हा त्यांना डुक्कर पुरवण्याचे काम करत होता.
परदेशी हे या डुक्करांचे मांस तयार करून ताडीवाला रोड येथील गोदामात ठेवत होते. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने त्यांच्या गोदामात पुराचे पाणी शिरले आणि सर्व माल खराब झाला. यामध्ये परदेशी यांचे जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान परदेशी भरून काढू शकले नाहीत. दुसरीकडे लक्कडसिंग हा त्यांच्याकडे तुझे नुकसान झाले त्याला मी काय करू, माझे पैसे दे, असे म्हणून पैशांची वारंवार मागणी करत होता. तो शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होता. मुलांना उचलून नेण्याची धमकी देत होता.
मात्र, त्यांना लक्कडसिंग आणि किरपानसिंग यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून राजा परदेशी यांनी शनिवारी दुपारी घराच्या टेरेसवर स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहेत.