पळसदेव; पुढारी वृत्तसेवा: बैलजोड म्हणजे शेतकर्यांचा भक्कम साथीदार; परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा साथीदार मात्र शेतकर्यांपासून दूर होत आहे. बैलांच्या घुंगरांचा आवाज वरचेवर क्षीण झाला आहे. शेतकर्यांच्या दावणीला बैलजोड अपवादानेच पाहावयास मिळत आहेत. बदलत्या काळाच्या ओघात बैलपोळा सण केवळ औपचारिकता राहिला असून, पूजाअर्चापुरता साजरा होताना दिसत आहे. शेतीमधील वाढत्या आधुनिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत आहे. शेतकर्यांकडे गाय, बैल राहिले नाहीत. बैल
सांभाळण्यासाठी मजूर मिळत नाहीत, त्यामुळे खरेदीला ब्रेक लागला आहे. बैलजोडीने केली जाणारी कामे वेळखाऊ झाली आहेत. शेतकर्यांना झटपट कामे करण्याची सवय लागली आहे. ट्रॅक्टरद्वारे ही कामे झटपट होत आहेत. त्यामुळे बैलाचा प्रश्न आता येतच नाही. सध्या बैलांच्या किमतीही भरमसाट वाढल्याने एकेकाळी सर्वत्र पाहावयास मिळणारा सर्जा राजा आता शर्यतीत धावतानाच तेवढा पाहावयास मिळत आहे.